Headlines

कुराशच्या बनावट प्रमाणपत्रप्रकरणी 25 जणांना अटक:यात 14 पोलिसांचा समावेश, 19 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल




कुराश खेळाची बनावट प्रमाणपत्रे सादर करून सरकारी नोकरी मिळवल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत 25 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये 14 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असून, काही आरोपींना येरवडा कारागृहात पाठवण्यात आले आहे.तर 19 पोलिस कर्मचाऱ्यांवर याप्रकरणी गुन्हा दाखल असून त्यापैकी पाच पोलिस कर्मचारी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीने पसार झाले आहेत. खेळाच्या प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी मिळवून देणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. काही जणांनी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग न घेताच बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे क्रीडा आरक्षणाचा लाभ मिळवल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रमाणपत्रांचा वापर करून संबंधितांनी सरकारी नोकऱ्या मिळवल्याचा आरोप आहे. प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आणखी काही धक्कादायक बाबीही उघड झाल्या आहेत. आरोपी बनवले जाण्याची कुणकुण लागताच धुळे येथील प्रशिक्षण केंद्रातून एक पोलिस कॉन्स्टेबल पळून गेला. तर अटकेच्या भीतीने एका एजंटचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. बनावट प्रमाणपत्राच्या आधारे पोलिस दलात भरती झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी गेलेले, तसेच भरती होऊनही प्रशिक्षणासाठी न गेलेले काही जणही अटक केलेल्यांमध्ये आहेत. या प्रकरणाशी संबंधित आणखी काही आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. तपासात पोलिस विभागाव्यतिरिक्त इतर सरकारी विभागांतही अशाच प्रकारे काही जणांनी नोकऱ्या मिळवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करून त्यांच्या विभागांना पत्रे पाठवली जात आहेत. संबंधितांविरोधात विभागीय आणि कायदेशीर कारवाई करता यावी, यासाठी ही प्रक्रिया सुरू आहे. क्रीडा आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्रांचा वापर झाल्याचा आरोप असल्याने या प्रकरणाची व्याप्ती पोलिस दलापुरती मर्यादित नसल्याचे तपासातून पुढे येत आहे. इतर विभागांतील कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू करण्यात आली असून, गुन्हे शाखेकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *