![]()
दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरातील मूर्तिकारांच्या कारखान्यात लक्ष्मीमूर्ती घडवण्याची लगबग सुरू आहे. शहरात २५ हजार लक्ष्मीमूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यंदाचे दर मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत जैसे थे राहतील, असे मूर्तिकारांनी सांगितले. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. घरोघरी लक्ष्मीची मूर्ती प्रतिष्ठापित करून पूजा केली जाते. त्यामुळे दिवाळीपूर्वीच मूर्तींची मागणी वाढते. ही मागणी लक्षात घेऊन चिकलठाणा, बेगमपुरा, पुंडलिकनगरातील मूर्तिकारांकडून मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. दिवाळीतील मूर्तिपूजेची परंपरा धार्मिक ग्रंथांतील देवतांशी जोडलेली आहे. दिवाळीच्या अमावास्येला लक्ष्मीपूजन, तर धनत्रयोदशीला लक्ष्मी-कुबेर पूजन आणि भगवान धन्वंतरी यांच्या पूजनाला महत्त्व आहे. श्रीमद्भागवत महापुराणाच्या आठव्या स्कंधातील समुद्रमंथनाच्या कथेत भगवान धन्वंतरींच्या प्राकट्याचे वर्णन आढळते. त्यामुळे लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरी यांच्या मूर्तींना अनुक्रमे समृद्धी, धन आणि आरोग्याशी जोडले आहे. मूर्तींच्या निर्मितीमध्ये आकाराइतकेच रंगकाम आणि सजावटीला महत्त्व असते. लक्ष्मीमूर्तींना आकर्षक रंग, मुकुट, दागिने, चेहऱ्यावरील भाव आणि हातातील वस्तू यांची सजावट केली जात आहे. काही मूर्तींमध्ये पारंपरिक रंगसंगतीला प्राधान्य दिले जाते, तर काही मूर्तींना आधुनिक पद्धतीने सजवले जाते. पारंपरिक मूर्तींसोबत वैविध्यपूर्ण पर्याय पारंपरिक स्वरूपातील लक्ष्मीमूर्तींना आजही पसंती मिळत आहे. मात्र, पूजेच्या मांडणीला आकर्षक स्वरूप देण्याकडेही कल वाढत आहे. ४ इंचांपासून ते १ फुटापर्यंत मूर्ती बाजारात आणल्या जाणार आहेत. कमळावर विराजमान लक्ष्मी, लक्ष्मी-कुबेर स्वरूपातील मूर्ती, स्वतंत्र कुबेर आणि धन्वंतरी मूर्तींची मागणी असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. लक्ष्मी ही संपत्ती, समृद्धी आणि ऐश्वर्याची देवता, लक्ष्मीपूजनासाठी सर्वाधिक प्राधान्य लक्ष्मी ही संपत्ती, समृद्धी आणि ऐश्वर्याची देवता मानली जाते. लक्ष्मीपूजनासाठी या मूर्तीला प्राधान्य दिले जाते. धनसंपत्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कुबेराच्या मूर्तीचीही खरेदी केली जाते. आरोग्य, आयुर्वेदाशी संबंधित धन्वंतरीच्या मूर्तींनाही ग्राहक पसंती देत आहेत. दुष्काळातही दर स्थिर सध्या दुष्काळसदृश परिस्थिती आहे. यामुळे यंदा मूर्तींचे दर गतवर्षीच्या तुलनेत स्थिर राहणार असल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. चार इंच मूर्ती ६०, १ फुटाची मूर्ती १५० रुपयांपर्यंतच्या दरात मिळणार असल्याचे मूर्तिकार कारागीर संघटनेचे किशोर गोरखोदे म्हणाले.
Source link
दिवाळीसाठी 25 हजार लक्ष्मीमूर्तींचे काम अंतिम टप्प्यावर; यंदा भाव स्थिर:4 इंचांपासून 1 फुटापर्यंतच्या कमळावर विराजमान लक्ष्मी