Headlines

शिवन्यात जलजीवन मिशनचे काम रखडले:चार कोटींहून अधिक खर्च करूनही काम 40 टक्केच पूर्ण झाले




शिवन्यासह सहा गावांतील सुमारे ५० हजार नागरिकांची तहान भागवणारा अजिंठा-अंधारी मध्यम प्रकल्प मृतसाठ्यात पोहोचला आहे. त्यातच तब्बल चार कोटींहून अधिक खर्च होऊनही जलजीवन मिशनचे काम अपूर्ण असल्याने आगामी सात महिने पाणीपुरवठा कसा करायचा, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. दिवाळीनंतर पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची भीती व्यक्त होत आहे. गावातील एकूण २,७८९ घरांपैकी २,६५५ नळजोडण्या झाल्याची नोंद २१ जुलै २०२६ पर्यंत आहे. तसेच ३१ अंगणवाड्या आणि १८ शाळांना नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. मात्र, धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने या सुविधांचा लाभ नियमितपणे कसा मिळणार, हा प्रश्न कायम आहे. पाणीटंचाईवर तात्पुरता उपाय म्हणून शिवना येथील गावतलावात विहीर खोदण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नवीन विहिरीत पाणी साचत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळण्याची आशा आहे. पंचायत समिती सदस्य शेख सलीम आणि विनायक काटकर यांच्या पुढाकारातून हे काम सुरू आहे. दरम्यान, परिसरातील विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच विहिरी अधिग्रहित केल्या जातील, अशी माहिती ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र गंगावणे यांनी दिली. यावेळी गणेश सपकाळ, शेख राजिक, इस्माईल कुरेशी आदी उपस्थित होते. निधीअभावी काम रखडले जलजीवन मिशनअंतर्गत ५ फेब्रुवारी २०२३ रोजी ४ कोटी ५१ लाख ९५ हजार ५०० रुपयांच्या योजनेला सुरुवात झाली. जुन्या योजनेच्या नकाशावरच नवीन काम सुरू करण्यात आले. त्यानंतर निधी उपलब्ध होत नसल्याचे कारण देत काम अनेक महिने बंद राहिले. ३१ मार्च २०२४ पर्यंत योजना पूर्ण करण्याची मुदत असतानाही २०२६ उजाडले, तरी केवळ ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *