![]()
नगरपरिषद क्षेत्रातील आशा सेविकांना दिवाळीनिमित्त १० हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) मंजूर करावे, अशी मागणी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनने निवेदनाद्वारे केली आहे. मनमाड नगरपरिषद क्षेत्रातील सुमारे १.५० लाख नागरिकांना आशा सेविका आरोग्यविषयक सेवा पुरवतात. त्यांच्या कामाची दखल घेऊन बोनस देण्याची मागणी युनियनने केली आहे. मनमाड नगरपरिषद क्षेत्रात आशा सेविका आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक कामे करतात. नागरिकांना आरोग्यसेवा देण्यासाठी त्या सातत्याने मेहनत घेत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करताना आशा सेविका आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून जनतेच्या आरोग्याची काळजी घेतात. सणासुदीच्या काळात वाढत्या महागाईमुळे त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक ताण येत असल्याने त्यांना दिवाळीनिमित्त १० हजार रुपये सानुग्रह अनुदान देणे आवश्यक असल्याचे युनियनने म्हटले आहे. नगरपरिषद प्रशासनाने आशा सेविकांच्या योगदानाचा विचार करून १० हजार रुपये दिवाळी बोनस मंजूर करावा आणि त्याच्या वितरणासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, जिल्हाध्यक्ष विजय दराडे आणि शहराध्यक्ष मोहिनी मैद यांच्या नेतृत्वाखाली वैशाली जगताप, रत्ना केदारे आदींनी मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांना निवेदन दिले.
Source link
आशा सेविकांना 10 हजार रुपये दिवाळी बोनस द्यावा:आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनची मागणी