Headlines

फडणवीसांवर बोलताना तुमची कुवत आणि औकात काय?:महायुतीत राहून आमचेच पाय तोडणाऱ्या 'शेखचिल्लीं'ना भाजप भीक घालत नाही; प्रवीण दरेकरांना हल्लाबोल




“देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्र रस्ते, पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या योजनांनी वेगाने पुढे जात आहे. मात्र, फडणवीसांविषयी मनात टोकाचा तिरस्कार आणि पोटात मळमळ बाळगून रोज उठून त्यांच्या नेतृत्वावर टीका करणाऱ्यांची नेमकी कुवत आणि औकात काय आहे? सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर स्वतःचेच तोंड भाजते. महायुतीत राहायचे, एकाच ताटात जेवायचे आणि आमच्याच पाठीत खंजीर खुपसून आमचे पाय तोडायचे, हा ‘शेखचिल्ली’सारखा मूर्खपणा चालणार नाही. ज्या फांदीवर बसलात तीच तोडली तर स्वतःचाच कडेलोट होईल, याचे भान मित्रपक्षाने ठेवावे. भाजप कधी टोकाची भूमिका घेत नाही; पण गृहीत धरून सकाळ-संध्याकाळ वार करणार असाल, तर जशास तसे उत्तर द्यायला भाजपही मागे-पुढे पाहणार नाही,” असा आक्रमक आणि संतापजनक इशारा भाजपचे विधान परिषदेतील ज्येष्ठ नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निकालांनंतर महायुतीमधील शिंदे गटाच्या नेत्यांकडून भाजपवर आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुरू झालेल्या चिखलफेकीचा दरेकर यांनी पत्रकार परिषदेत सडकून समाचार घेतला. यावेळी त्यांनी पुणे, अमरावती आणि मराठवाड्यातील पराभवाचे दाखले देत शिवसेनेच्या दुटप्पीपणाचा बुरखा टराटरा फाडला. धंगेकर तुमची औकात काय?; एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांना आवर घालावा! नेतृत्व बदलाची भाषा करणाऱ्या रवींद्र धंगेकरांचा समाचार घेताना प्रवीण दरेकर म्हणाले, “रवींद्र धंगेकरांसारखे लोक फडणवीसांचे नेतृत्व बदलण्याची भाषा करत आहेत. स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असू शकते, त्याला आमची हरकत नाही; पण देवेंद्र फडणवीसांसारख्या लोकप्रिय नेत्यावर शिंतोडे उडवण्याची तुमची पात्रता आहे का? अशा फुटकळ लोकांच्या वक्तव्यांना भाजप भीक घालत नाही.” शिंदे साहेबांची संमती आहे का? “धंगेकर हे काही अधिकृत किंवा जबाबदार नेते नाहीत. मात्र, ते पुण्याचे महानगरप्रमुख आहेत. वरिष्ठांच्या आशीर्वादाशिवाय ते बोलूच शकत नाहीत. त्यामुळे धंगेकरांच्या विधानाला शिवसेना पक्षाची संमती आहे का, हे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट करावे.” संजय गायकवाडांवर संताप “शेतकरी आत्महत्या करत असतील तर त्यांच्या अंत्यविधीला जाऊ नका, असे वादग्रस्त विधान संजय गायकवाड करतात. शासन दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करत असताना त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा हा विकृत मानसिकतेचा वेडा माणूस आहे. शिंदे साहेबांनी अशा वाचाळवीरांना तात्काळ आवरावे.” अमरावतीत भाजपमुळे सरनाईक जिंकले; पुण्यात मित्रपक्षाने स्मिता जाधवांचा घात केला! महायुतीतील घटकपक्षांच्या गद्दारीचा पाढा वाचताना दरेकर यांनी स्पष्ट आकडेमोड मांडली. “अमरावती शिक्षक मतदारसंघात भाजपच्या अधिकृत कार्यकर्त्या उभ्या होत्या. मात्र, महायुतीचा धर्म पाळत भाजपने तात्काळ कारवाई करत आमच्याच उमेदवाराला ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. भाजपने ताकद दिली म्हणूनच शिंदे सेनेचे किरण सरनाईक त्या ठिकाणी जिंकून आले; अन्यथा त्यांचाही पराभव निश्चित होता.” पुण्यात उघडपणे मते वळवली “पुणे पदवीधर मतदारसंघात आमच्या उमेदवार स्मिता जाधव यांच्याविरोधात मित्रपक्षाने उघडपणे कारवाया केल्या. धंगेकरांनी निवडणुकीपूर्वी जाहीरपणे विरोधकांचे काम केले आणि निकाल आल्यावर आनंदोत्सव साजरा केला. त्यांनी मते वळवली नसती, तर स्मिता जाधव 100% विजयी झाल्या असत्या.” अब्दुल सत्तारांनी उघडपणे पाडले “मराठवाड्यात तर शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार छातीठोकपणे सांगतायत की, ‘प्रतापसिंह पाटील यांच्या विजयात माझा खारीचा वाटा आहे!’ महायुतीत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडण्याची हिंमत सत्तारांमध्ये कशी येते? सत्तारांचे हे कृत्य वैयक्तिक आहे की पक्षाचा आदेश होता, याचा खुलासा पक्षनेतृत्वाने केला पाहिजे.” शीतल म्हात्रे आणि आनंद परांजपेंनी आरशात पाहावे शिवसेनेच्या प्रवक्त्यांवर पलटवार करताना त्यांनी सुनावले. “पुण्यात भाजपचा उमेदवार आयात होता, असा आरोप शीतल म्हात्रे करत आहेत. अहो, तुमचे अमरावतीचे किरण सरनाईक कालपर्यंत कुठल्या पक्षात होते? राष्ट्रवादीतून तुमच्या पक्षात आले ना? विधानसभेला तर भाजपचे नेते आणि आमदार एका रात्रीत पळवून तुम्ही तुमचे उमेदवार केले. एका बोटाने आमच्याकडे दाखवताना चार बोटे स्वतःकडे आहेत याचे भान ठेवा.” दरेकर म्हणाले, “भाजपला आत्मपरीक्षणाचा सल्ला देणाऱ्या आनंद परांजपे यांनी आधी स्वतःला आरशात पाहावे. भाजप २ खासदारांपासून स्वबळावर इथपर्यंत पोहोचला आहे, कारण आम्ही चुका दुरुस्त करतो. पण युतीत राहायचे आणि एकत्र नांदताना मित्रपक्षाच्याच पाठीत वार करायचा, हे खपवून घेतले जाणार नाही.” 28 पैकी काँग्रेसला अवघी 1 जागा; संजय राऊतांनी शहाणपणा शिकवू नये! काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आनंदाची खिल्ली उडवताना दरेकर म्हणाले, “देशभरात 28 जागांवर मतपत्रिकांवर (बॅलेट पेपर) निवडणुका झाल्या. त्यात सर्वाधिक मते आणि सर्वाधिक जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत. काँग्रेसला अवघी 1 जागा मिळाली, तीही अपक्षांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांवर. ठाकरे गटाचा तर महाराष्ट्रात एकही उमेदवार 10,000 मतांचा आकडा गाठू शकला नाही. लोकांमध्ये शून्य स्थान असताना दुसऱ्याच्या वरातीत विकृत नाचणे विरोधकांनी थांबवावे.” संघाला बदनाम करण्याचा विकृत प्रयत्न “नागपूरच्या निकालानंतर काँग्रेसकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाला लाथ मारत असल्याचे हिणकस फोटो व व्यंगचित्रे फिरवली जात आहेत. अशा किरकोळ आणि विकृत प्रवृत्तीमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशव्यापी मोठेपणावर काडीचाही परिणाम होत नाही.” भाजप उतावळ्यांचा पक्ष नाही; सातत्याने डिवचल्यास विचार करावा लागेल! भाजपच्या भावी रणनीतीवर स्पष्ट भूमिका मांडताना त्यांनी इशारा दिला. “सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन नवीन यांची २ नोव्हेंबर रोजी भेट घेऊन महाराष्ट्रातील निवडणुकीचा सविस्तर अहवाल देणार आहेत. भाजप लगेच टोकाचा निर्णय घेणारा चिल्लर किंवा उताविळ पक्ष नाही. आम्ही संयमाने आणि विचारपूर्वक पावले टाकतो.” एकजुटीने वागा, अन्यथा महायुती धोक्यात “महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीला निवडून दिले आहे. ‘तो मोठा की मी मोठा’ या ईर्षेतून जर एकमेकांचे पाय खेचले, तर महायुतीचे वातावरण खराब होईल. महायुतीची गरज सर्वांनाच आहे; त्यामुळे मित्रपक्षाने माध्यमांत आततायीपणाने बोलणे थांबवून समन्वय राखावा,” असा परखड सल्ला आमदार प्रवीण दरेकर यांनी शेवटी दिला. —————————————————- हेही वाचा… सतीश चव्हाणांचे 18 वर्षांचे साम्राज्य संपवण्यात माझा खारीचा वाटा: अब्दुल सत्तार म्हणाले- लपूनछपून नाही, उघडपणे पाडले; नवनाथ बन यांच्या टीकेलाही दिले सडेतोड प्रत्युत्तर “मराठवाडा पदवीधर मतदारसंघात 18 वर्षे आमदार राहिलेल्या सतीश चव्हाण यांनी कोणतेही काम केले नव्हते. त्यामुळे त्यांचे 18 वर्षांचे साम्राज्य संपवण्यात आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या ऐतिहासिक विजयात माझा खारीचा वाटा आहे. मी लपूनछपून नव्हे, तर पहिल्या दिवसापासून उघडपणे सतीश चव्हाणांच्या विरोधात प्रचार केला. मतदान केंद्रांना भेटी देतानाही माझी हीच ठाम भूमिका होती आणि ती आजही बदललेली नाही,” असा मोठा राजकीय गौप्यस्फोट शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *