Headlines

पर्यावरणावर बोलणं एक फॅशन झालीय!:त्या नेते आणि अभिनेत्यांना सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या शिकवणीची गरज, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा पलटवार




“शाश्वत विकास म्हणजे विकासाची फळे मिळवताना पर्यावरणाचा असा समतोल राखणे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना त्याचा त्रास होणार नाही. परंतु आजकाल पर्यावरणावर आणि ग्लोबल वॉर्मिंगवर बोलणे ही काहींसाठी निव्वळ फॅशन झाली आहे. मोठ्या कॉन्फरन्समध्ये जायचे आणि स्वतःला पर्यावरणाचे एकमेव कैवारी समजायचे, असा हा प्रकार आहे. क्लीन एनर्जी, क्लायमेट चेंज आणि कार्बन एमिशनचे गणित काय असते, याची शिकवणी महाराष्ट्रातील काही नेते आणि अभिनेत्यांना देण्याची गरज आहे,” असा हल्लाबोल मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केला आहे. कर्जत येथील 3000 मेगावॉटच्या पंप स्टोअरेज प्रकल्पावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत साटम यांनी विरोधकांच्या दुटप्पीपणावर बोट ठेवत जोरदार प्रत्युत्तर दिले. 3000 मेगावॉट थर्मल प्लांटचे एमिशन रोखायला 28 कोटी झाडं लागतील कर्जत येथील प्रकल्पाच्या पर्यावरणीय फायद्यांची आकडेवारी मांडताना अमित साटम म्हणाले, “सौर ऊर्जा केवळ दिवसा मिळते, रात्री मिळत नाही. संध्याकाळी विजेची गरज भागवण्यासाठी जर 3000 मेगावॉटचा कोळशावर चालणारा थर्मल पॉवर प्लांट उभारला, तर त्यातून निर्माण होणारे कार्बन एमिशन शमवण्यासाठी तब्बल 28 कोटी झाडे लावावी लागतील. त्यासाठी मुंबई शहराच्या 15 पट आकाराची जागा लागेल.” 40 लाख वाहनांइतके प्रदूषण रोखणार “3000 मेगावॉटचा थर्मल पॉवर प्लांट रस्त्यावरील 40 लाख वाहनांइतके कार्बन एमिशन करतो. त्यामुळे 300 ते 400 हेक्टरमध्ये 3000 मेगावॉटचा पंप स्टोरेज प्लांट उभारणे हे अधिक पर्यावरणपूरक आहे, हे शाळेतील लहान मूलही सहज सांगेल. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘बालकां’ना हे साधे गणित समजत नाही.” भीमाशंकरपासून प्रकल्प दूर “हा प्रकल्प भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरापासून २० किलोमीटर आणि भीमाशंकर अभयारण्यापासून १६ किलोमीटर दूर आहे. केवळ सह्याद्रीच्या एका छोट्या भागात हा प्रकल्प होत असताना ‘सह्याद्री पळवला’ किंवा ‘गुजरातसाठी प्रकल्प’ असा खोटा नरेटिव्ह पसरवून महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा विरोधकांचा कट आहे.” कर्जतमध्ये टुरिझम करणाऱ्यांनी बीडमधील 540 हेक्टरवरील 2 लाख झाडं मोजावीत ठाकरे गट आणि काँग्रेसच्या कार्यकाळातील निर्णयांवरून साटम यांनी जुना हिशेब काढला. “1997 ते 2022 दरम्यान मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंची सत्ता होती, मातोश्रीवरून महापालिका चालायची. त्या काळात मुंबईसाठी मध्य वैतरणा प्रकल्प आणला गेला, तेव्हा 10000 झाडे तोडण्याचे नियोजन असताना प्रत्यक्षात सुमारे 1 लाख झाडे तोडली गेली.” बीडमध्ये लावायची होती 2 लाख झाडं “त्या वृक्षतोडीच्या बदल्यात (कॉम्पन्सेटरी अफॉरेस्टेशन) बीड जिल्ह्यातील 540 हेक्टर जमिनीवर 2 लाख झाडे लावायची होती. यासाठी मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपये वन विभागाला दिले होते. टिप्पटवाडी, भवानवाडी, कुट्टीवाडी, आंबेवडगाव, धारूर, गवणदरा, चिखलबीड, सोनकोटा, मोहखेड, कहारवाडी, कुसलांब, भडकेल आणि अमळनेर या 13 ठिकाणी ही झाडे लावली गेली का?” नेते आणि अभिनेत्यांना आव्हान “पांढरा कुर्ता-पायजमा आणि स्पोर्ट्स शूज घालून कर्जतमध्ये टुरिझम करणाऱ्या उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बीडमध्ये जाऊन ती 2 लाख झाडे मोजावीत. तिथे प्रत्यक्ष झाडे लावलीच गेली नाहीत, असे फोटो माझ्याकडे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी.” आरे कारशेडच्या विरोधाने 10000 कोटींचा भुर्दंड; मेट्रोमुळे 60 दिवसांत कार्बन मिटिगेशन” मागील आंदोलनांचे दाखले देत त्यांनी विकासातील अडथळ्यांवर निशाणा साधला. “आरे कारशेडच्या वेळी २५०० झाडांवरून विरोध केला गेला आणि त्यामुळे प्रकल्पाचा खर्च तब्बल १०००० कोटी रुपयांनी वाढला. मात्र ३५० किलोमीटरची मेट्रो केवळ ६० दिवसांत जितके कार्बन एमिशन कमी करते, तितके कमी करण्यासाठी त्या २५०० झाडांना २० वर्षे लागतात, हे साधे विज्ञान कॉप-२६ (COP-26) परिषदेत जाणाऱ्यांना कधी समजणार?” ग्लोबल फंडिंग आणि अर्बन नक्षलवाद “भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनत आहे, हे काही जागतिक शक्तींना बघवत नाही. देशातील मोठे प्रकल्प रोखण्यासाठी देशविरोधी शक्ती एनजीओ आणि आता विरोधकांना हाताशी धरून आंदोलने उभी करत आहेत, असा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी (IB) आधीच दिला आहे.” २०७० चे नेट झिरो उद्दिष्ट गाठायचे असेल तर क्लीन एनर्जी हवीच साटम म्हणाले, “चीन, अमेरिका आणि जपान या देशांमध्ये पंप स्टोरेज प्रकल्प वेगाने वाढत आहेत. भारताने २०७० पर्यंत ‘नेट झिरो एमिशन’ साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, अणुऊर्जा आणि पंप स्टोरेज अशा क्लीन एनर्जी पर्यायांना गती द्यावीच लागेल. महाराष्ट्रात गेल्या १० वर्षांत खारफुटी (मँग्रोव्ह) आणि ट्री कव्हर मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या 3000 मेगावॉटच्या प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रातील हजारो तरुणांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. तयार होणारी वीजही पहिल्यांदा महाराष्ट्रालाच मिळणार आहे.” विरोधकांनी केवळ प्रसिद्धीसाठी आणि स्वतःचे राजकारण जिवंत ठेवण्यासाठी राज्याच्या विकास प्रकल्पांना विरोध करून जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, असा इशारा अमित साटम यांनी शेवटी दिला. ————————————————————————————- हेही वाचा… फडणवीसांसह ठाकरे बंधू एकाच मंचावर: कार्यक्रमाआधी बंद दाराआड चर्चा, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या भूमिका घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात आयोजित एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने हे नेते एकत्र आले. विशेष म्हणजे, सार्वजनिक कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आल्याने या भेटीबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *