Headlines

अमित साटमांची राज ठाकरेंवर बोलण्याची लायकी नाही:तेव्हा महापालिकेत पहारेकरी झोपा काढत होते का? मनसे नेते संदीप देशपांडेंचा भाजपवर हल्लाबोल




“मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांची मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर बोलण्याची अजिबात लायकी नाही, त्यांनी स्वतःच्या लायकीत राहावे; अन्यथा आमचे तोंड सुटले तर त्यांना महागात पडेल. कर्जत येथील वृक्षतोडीवरून लक्ष विचलित करण्यासाठी 2005 मधील मध्य वैतरणा प्रकल्पाची उकरून काढलेली चर्चा हा निव्वळ बालिशपणा आहे. २००५ मध्ये मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेसोबत सत्तेत नव्हती का? महापालिकेतील स्थायी समितीच्या तिजोरीची मलई खाताना भाजपचे पहारेकरी झोपा काढत होते का? ‘तू पूर्वी चार झाडे तोडलीस म्हणून आता आम्ही चाळीस तोडणार’, म्हणजेच ‘तू गाय मारलीस म्हणून मी वासरू मारणार’ ही सरकारी मानसिकता म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे,” अशा अत्यंत आक्रमक, बोचऱ्या आणि शेलक्या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपवर चौफेर हल्ला चढवला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी कर्जत-भीमाशंकर येथील प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्प, मध्य वैतरणा धरणातील 2 लाख झाडांचा वाद, भाजप नेत्यांनी केलेले आंतरराष्ट्रीय फंडिंगचे आरोप, समुद्रातील तरंगते होर्डिंग्ज आणि पर्यावरण ऱ्हासावर भाजपची अक्षरशः पिसे काढली. साटमांनी लायकीत राहावे; मध्य वैतरणावेळी भाजप सत्तेत झोपा काढत होता का? मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी उपस्थित केलेल्या बीडमधील २ लाख झाडांच्या मुद्द्यावर बोलताना देशपांडे म्हणाले, “अमित साटम म्हणतात की मध्य वैतरणा धरणाच्या वेळी कापलेल्या झाडांच्या बदल्यात बीडमध्ये २ लाख झाडे लावली नाहीत, मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी करावी. अरे, तुम्ही स्वतः सरकारमध्ये बसला आहात, तर थेट मुख्यमंत्र्यांच्या कानात जाऊन सांगून चौकशी लावा ना! पत्रकार परिषदा घेऊन कसली नौटंकी करता? २००५ मध्ये झाडे लावली नसतील तर नक्कीच संबंधितांवर कारवाई करा.” भाजपही सत्तेत भागीदार होती “2005 मध्ये मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंसोबत भाजप सत्तेत होती की नाही? गोपीनाथ मुंडे साहेब होते, देवेंद्र फडणवीस साहेब होते; मग तेव्हा भाजपने बीडमध्ये जाऊन झाडे का लावली नाहीत? तेव्हा महापालिकेत तुम्ही पहारेकरी म्हणून काय झोपा काढत होतात का? स्थायी समितीतील निर्णयांमध्ये भाजपचा वाटा नव्हता का?” पाकिस्तानी एजंट म्हणणारा अमित साटम वेडा! विरोधकांना आंतरराष्ट्रीय फंडिंग आणि देशविरोधी ठरवणाऱ्या भाजपच्या वक्तव्यांचा देशपांडे यांनी समाचार घेतला. “आम्हाला ‘पाकिस्तानी एजंट’ आणि ‘आंतरराष्ट्रीय फंडिंग घेणारे’ म्हणणारे अमित साटम वेडे झाले आहेत. सकाळी भाजपच्या कॉन्फरन्स कॉलवर ठरवून दिलेला अजेंडा माध्यमांसमोर येऊन पोपटासारखा वाचून दाखवायचा, एवढेच काम ते करतात.” इलेक्टोरल बाँड्सचा खुलासा करा “कर्जतमधील मूळ विषयावरून लक्ष दुसरीकडे भरकटवण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. ज्या टोरंट कंपनीच्या प्रकल्पासाठी हा सगळा घाट घातला जातोय, त्या टोरंट कंपनीकडून भाजपने इलेक्शन बाँड्सच्या (Electoral Bonds) माध्यमातून नेमके किती कोटी रुपये लाटले? याचे उत्तर भाजपने आधी जनतेला जाहीरपणे द्यावे. तुम्ही ज्यांचे मीठ खाल्ले आहे, त्यांचे लांगूलचालन करण्यासाठी ही दलाली चालवली आहे का?” गाय मारली म्हणून वासरू मारणार; ही कसली विकृत मानसिकता? पर्यावरणाच्या ऱ्हासावरून राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर त्यांनी कठोर शब्दांत ताशेरे ओढले. “आमचा कोणत्याही विकास प्रकल्पाला विरोध नाही, मनसे विकासाच्या बाजूनेच आहे. परंतु ‘अ‍ॅट व्हॉट कॉस्ट?’ (पर्यावरणाचा किती बळी देऊन विकास करणार?) हा खरा कळीचा मुद्दा आहे. जगातील हवामान बदलत असताना ‘त्यांनी पूर्वी झाडे कापली म्हणून आता आम्ही जास्त झाडे कापणार’ ही मानसिकता विकृत आहे.” साटमांच्या मतदारसंघातच मँग्रोव्हची कत्तल “अमित साटम इतरांना सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे धडे शिकवत आहेत; मात्र त्यांच्या स्वतःच्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघात आणि कोस्टल रोडच्या कामासाठी हजारो खारफुटींची (मँग्रोव्हज) सर्रास अनधिकृत कत्तल केली जात आहे, यावर साटम तोंड का उघडत नाहीत?” मुंबईच्या समुद्रात 29 तरंगते होर्डिंग्ज मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर प्रस्तावित असलेल्या २९ एलईडी तरंगत्या होर्डिंग्जच्या योजनेवरही त्यांनी संताप व्यक्त केला. “मुंबईच्या समुद्रात 29 ठिकाणी तरंगते फ्लोटिंग होर्डिंग्ज लावले जाणार आहेत. या जाहिरातींच्या झगमगाटामुळे समुद्रातील जलचरांना, माशांना आणि संपूर्ण सागरी परिसंस्थेला मोठा धोका निर्माण होईल. या सरकारच्या हव्यासाला कोणतीही सीमा उरलेली नाही. समुद्रात होर्डिंग्ज लावण्यापेक्षा थेट महापौरांच्या कपड्यांवरच जाहिरातींचे बोर्ड लावा, आता तेवढेच बाकी ठेवले आहे,” असा सणसणीत टोला देशपांडे यांनी लगावला. तिन्ही नेते एका मंचावर; देशपांडे म्हणाले— छान वाटले! दादर येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर एकत्र आल्याच्या घटनेवर विचारले असता ते म्हणाले, “तिन्ही प्रमुख नेते एकत्र आले आणि एका मंचावर पाहायला मिळाले, हे दृश्य पाहून नक्कीच खूप छान वाटले. ते तिघेही अतिशय मोठे नेते आहेत, ते आपापसात काय बोलले यावर मी प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही,” असे सांगत देशपांडे यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले. —————————————————————- हेही वाचा… राज्याचे नेतृत्व बदलून एकनाथ शिंदेंकडे द्या: शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांची मागणी; म्हणाले- भविष्यात शिंदे-ठाकरे एकत्र येऊ शकतात विधान परिषद निवडणुकीतील महायुतीच्या कामगिरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या निकालाला राज्याच्या नेतृत्वाचा पराभव असल्याचे सांगत, राज्याचे नेतृत्व बदलून ते पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले पाहिजे, या आपल्या मागणीचा शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी पुनरुच्चार केला आहे. यासोबतच, शिवसेनेवर युतीधर्म न पाळल्याचा आरोप करणारे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावरही त्यांनी ‘ते पगारी माणूस आहेत, त्यांचे काय ऐकता?’ अशी टीका केली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *