Headlines

पदवीधर मतदारसंघांच्या तिन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या:भाजपच्या सत्तेला उतरती कळा लागण्याचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेला सुशिक्षित मतदारांचा पाठिंबा वाढल्याचा गोपाळ तिवारी यांचा दावा




महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने तीनही जागांवर मिळवलेल्या विजयातून भाजपच्या मनमानी सत्तेला उतरती कळा लागण्याचे संकेत मिळत आहेत. संविधानिक लोकशाहीचे रक्षण, मतपत्रिकेवर मतदान आणि सामाजिक सलोखा या मुद्द्यांवरील काँग्रेसच्या भूमिकेला सुशिक्षित मतदारांकडून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे या निकालातून दिसून येते, असे मत प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी व्यक्त केले. भाजपच्या हुकूमशाही राजकारणा विरोधात उच्चशिक्षित पदवीधरांनी दिलेला हा कौल देशव्यापी संदेश असल्याचा दावाही त्यांनी केला. विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश होता. त्यापैकी नागपूरमधून काँग्रेसचे अभिजित वंजारी, पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा जाधव-देशमुख आणि छत्रपती संभाजीनगरमधून प्रतापसिंह पाटील यांनी विजय मिळवला. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या तीन विभागांतील पदवीधर मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला. या निकालातून सुशिक्षित मतदारांनी राज्याच्या आणि देशाच्या भवितव्याचा विचार करून मतदान केल्याचे स्पष्ट होत असल्याचे तिवारी म्हणाले. पक्षफोडीच्या राजकारणाविरोधात जनमत? भाजपकडून सत्तेसाठी केले जाणारे पक्षफोडीचे राजकारण, स्वायत्त संस्थांचा कथित गैरवापर आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांविरोधात मतदारांमध्ये असंतोष वाढत असल्याचे तिवारी यांनी सांगितले. भाजपच्या मित्रपक्षांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली असून, सत्ताधारी राजकारणाच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि संतपरंपरेचा पुरोगामी वारसा लाभला आहे. या परंपरेतील सामाजिक समता, बंधुभाव आणि विवेकवादी विचारांना सुशिक्षित मतदारांनी महत्त्व दिले आहे. धर्माच्या नावावर राजकारण करण्यापेक्षा विकास, सामाजिक एकोपा आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक यांना प्राधान्य देण्याचा संदेश या निकालातून मिळत असल्याचे तिवारी यांनी म्हटले. मतपत्रिकेच्या मुद्द्यावरून मोदींना लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतपत्रिकेवरील मतदानासंदर्भातील वक्तव्यावरही तिवारी यांनी टीका केली. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका पसंतीक्रमानुसार मतपत्रिकेवर घेतल्या जातात. ही बाब पंतप्रधानांना माहीत नसणे ही बौद्धिक दिवाळखोरी म्हणावी काय, असा उपरोधिक सवाल त्यांनी केला. मतपत्रिकेवर मतदान ही काँग्रेसची भूमिका असून, निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राखणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *