![]()
बारामती विमानतळ परिसरात स्वतःवर खोटा गोळीबार आणि हल्ल्याचा कट रचून पोलीस प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप असलेल्या राणा सूर्यवंशीवर अद्याप अधिकृत गुन्हा का दाखल झाला नाही? त्याला वाचवणारे नेमके कोण, असा सवाल शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. या प्रकरणावरून त्यांनी गृहखात्याच्या कारभारावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. धंगेकर यांनी या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत गृहखात्याच्या भूमिकेवर टीका केली. राणा सूर्यवंशी पोलिसांना वेगवेगळ्या प्रकारे गोंधळात टाकत असतानाही त्याच्यावर कारवाई का होत नाही? स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव करून पोलीस प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप असताना गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई का होत आहे? गृहखाते या प्रकरणात मूकप्रेक्षक बनले आहे का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. या प्रकरणामागे काही मोठ्या राजकीय व्यक्तींचा किंवा प्रभावशाली लोकांचा वरदहस्त आहे का, याचाही खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी धंगेकर यांनी केली. राणा सूर्यवंशीचे कोणाशी आर्थिक आणि राजकीय हितसंबंध आहेत? त्याला वाचवण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे? पुणे पोलिसांवर कोणाचा दबाव आहे आणि पोलिसांचा आवाज नेमका कोण दाबत आहे, असे सवाल त्यांनी केले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती जनतेसमोर मांडावी. संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी आणि या प्रकरणामागील राजकीय तसेच आर्थिक संबंधांचा तपास करावा, अशी मागणी धंगेकर यांनी केली. राणा सूर्यवंशी प्रकरणामुळे राज्याच्या गृहखात्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाले असून, सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
Source link
रवींद्र धंगेकरांनी राणा सूर्यवंशीवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली:गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल; त्याला वाचवणारे कोण, पुणे पोलिसांवर दबाव आहे का?