![]()
कालबाह्य (एक्सपायर) आणि खराब झालेले अन्नपदार्थ नष्ट केल्याचे कागदोपत्री दाखवून, त्याच पदार्थांचे पुन्हा पॅकेजिंग करून त्यांची बाजारात सर्रास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने महाराष्ट्रासाठी आता स्वतंत्र आदेश काढला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या धडक मोहिमेअंतर्गत गेल्या काही दिवसांत करण्यात आलेल्या कारवायांमध्ये तब्बल 5 कोटी रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी दोन गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, कालबाह्य झालेले, खराब झालेले किंवा परत आलेले अन्नपदार्थ योग्य पद्धतीने नष्ट करण्याऐवजी त्यांची केवळ कागदोपत्री विल्हेवाट लावल्याचे दाखवले जाते. प्रत्यक्षात हा माल काही एजंटच्या माध्यमातून पुन्हा बाजारात आणला जातो. त्यानंतर त्याचे पुन्हा पॅकेजिंग करून नागरिकांना विकले जाते. काही ठिकाणी उत्पादनाच्या तारखांमध्ये फेरफार केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकारांना रोखण्यासाठी स्वतंत्र कॉम्प्लायन्स ऑर्डर काढण्यात आली आहे. कालबाह्य अन्नाची एकही पिशवी बाजारात येणार नाही.. पुढे तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, या नव्या आदेशानुसार कालबाह्य, खराब झालेले आणि परत आलेले अन्नपदार्थ योग्य पद्धतीने नष्ट केल्याचा पुरावा संबंधित कंपनीला द्यावा लागणार आहे. कालबाह्य झालेला माल चांगल्या अन्नपदार्थांपासून वेगळा ठेवणेहीह आवश्यक आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंद असलेल्या विल्हेवाट लावणाऱ्या कंपन्यांकडून अन्नपदार्थ नष्ट केल्याचे प्रमाणपत्र घेण्याची तरतूदही यामध्ये करण्यात आली आहे. कंपनी छोटी असो किंवा मोठी, कालबाह्य अन्नाची एकही पिशवी बाजारात येणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. भिवंडीत FDA ची धडक कारवाई दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडून या बेकायदा प्रकारांविरोधात गेल्या काही दिवसांपासून धडक कारवाई सुरू आहे. भिवंडीतील गुलजार नगरमध्ये सुरुवातीला 80 हजार आणि त्यानंतर 26 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. यासोबतच वडपे परिसरातील दोन ठिकाणांसह अंबरनाथ आणि पडघा येथेही कारवाई करत साठा जप्त करण्यात आला असून, संबंधितांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या मोहिमेत आतापर्यंत एकूण 10 कारवायांमध्ये तब्बल 5 कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून, यामध्ये कंपनीच्या मालकांसह एकूण 32 जणांना आरोपी करण्यात आले आहे. कारवाई हे केवळ एक माध्यम या कारवायांबाबत सांगताना तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, कारवाया वाढल्यामुळे काय फरक पडला, असा प्रश्न विचारला जातो. मात्र कारवाई हे केवळ एक माध्यम आहे. अन्न व्यवसायातील प्रत्येक घटकाची जबाबदारी निश्चित करून नियमांचे पालन करणारी यंत्रणा उभी करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत विविध क्षेत्रांसाठी 22 कॉम्प्लायन्स ऑर्डर काढण्यात आल्या आहेत. हॉटेल, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, शालेय पोषण आहार अशा विविध क्षेत्रांसाठी कोणते नियम पाळणे आवश्यक आहे, हे या आदेशांमधून स्पष्ट करण्यात आले आहे.
Source link
कालबाह्य अन्नपदार्थ रिपॅक करून बाजारात!:एफडीएची धडक कारवाई, 5 कोटींचा साठा जप्त; तुकाराम मुंढेंनी नवीन ऑर्डरच काढली