Headlines

"माझ्या जीवाला धोका आहे…":बिल्डर, गुंड आणि लोकप्रतिनिधींच्या संगनमताने गरिबांची घरे जमीनदोस्त; अभिजीत केळकरांचा संताप




मराठी अभिनेते अभिजीत केळकर यांनी मालाड पूर्व येथील गावठाण, पुष्पा पार्क आणि बाणडोंगरी परिसरातील रहिवाशांच्या घरांवर होत असलेल्या अन्यायकारक कारवाईवरून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. बिल्डर, काही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेच्या संगनमतामुळे गोरगरिबांच्या हक्काच्या घरांवर संकट ओढवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. या सर्व प्रकाराविरोधात आवाज उठवल्यामुळे आता आपल्या जीवालाही धोका निर्माण झाल्याची भीती केळकर यांनी व्यक्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी अभिजीतने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट मदतीची हाक दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये अभिजीत केळकर यांनी या दोन्ही नेत्यांबद्दल प्रचंड आदर आणि विश्वास असल्याचे म्हटले आहे. मात्र, मालाड पूर्वेतील सध्याच्या परिस्थितीकडे लक्ष वेधताना, ‘दिव्याखाली अंधार आहे’ अशा शब्दांत त्याने प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सरकारने यात तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे. अभिजीत केळकरांनी काय म्हटले? अभिजीत केळकर यांनी केलेल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले की, “माझ्या मनात देवेंद्र फडणवीस जी आणि एकनाथ शिंदे साहेब, आपल्याबद्दल अतीव प्रेम, आदर आणि विश्वास आहे…पण दिव्याखाली अंधार आहे… मालाड पूर्व, पुष्पापार्क, बाणडोंगरी ह्या आमच्या भागात असलेली आमची घरं हे आमचं सर्वस्व आहे, आमच्या आई वडीलांनी रक्ताचं पाणी करून, काडी काडी जमवून संसार केलेत, ही घरं उभारली आहेत, आम्ही लहानाचे मोठे इकडेच झालोय, ह्या चाळीतच, झोपडपट्टीत म्हणा हवं तर…गोरगरिबांच्या डोक्यावरचं छप्पर हिरावून, त्यांना रस्त्यावर आणण्याचा यशस्वी प्रयत्न, लोकप्रतिनिधींकडून राजरोसपणे होतोय, बिल्डरने ह्या लोकप्रतिनिधींना आणि सगळ्या सिस्टीमना पैशाच्या जोरावर आपल्या हातातलं खेळणं केलंय, स्थानिक गुंडांना पाळून, लोकांना धमक्या देऊन, धड कुठलीही ऍग्रिमेंट न करता, कागदपत्र न दाखवता, लोकांची घरं जमीनदोस्त करतायत.” माझ्या जीवाला धोका.. पुढे अभिजीत केळकर यांनी म्हटले की, “ह्याचा अनुभव गेले सहा महिने मी घेतोय आणि त्यांच्याशी लढतोय (मला नावं घेऊन कोणाचीही बदनामी करायची नाहीये. म्हणून मी नावं घेत नाहीये, पण कदाचित नाईलाजाने मला पुढे जाऊन ती घ्यावी लागतील…मी कोणालाही घाबरत नाही…माझ्या जीवाला धोका आहे. पण मी घरी माझ्या आईला आणि बायको मुलांना सांगून निघालोय) आम्हाला आमची हक्काची घरं हवी आहेत आणि त्यासाठी आपली मदत हवी आहे, आम्ही पुनर्विकासाच्या विरोधात नक्कीच नाही, पण ज्या विकासाचा पायाच खोट्या कागदपत्रांवर उभारला जातोय, तो विकासच पोकळ आहे. आम्हाला न्याय हवाय, तो आपल्याकडून मिळेल ह्याबद्दल मला खात्री आहे…बाकी देवाक काळजी,” असे त्यांनी म्हटले आहे. अभिजीत केळकरांनी थेट व्हिडिओच दाखवला तसेच अभिजीत केळकर यांनी काही व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत बिल्डर लोकांवर निशाणा साधला आहे. त्यांनी आणखी एक पोस्ट करत म्हटले की, “कुठला बिल्डर पुनर्विकासामध्ये घरं अशा पद्धतीने, अर्धवट तोडतो? ना कुठे पत्रे मारले आहेत, ना मलिदा वाहून न्यायला, जोडलेला रस्ता आहे, ह्या जागेत जायला फक्त एका बाजूला माणसं जाऊ येऊ शकतील एवढा एक पूल आहे. जोडलेला रोडच नसताना कसा होणार आहे हा प्रोजेक्ट? मुळात ज्यांची जमीन आहे, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं NOC घेतलेलं नाही. त्यामुळे त्या जागेचे मालक कोर्टात गेलेले आहेत, उद्या सगळं जमीनदोस्त केल्यावर कोर्टाने प्रोजेक्टलाच स्टे दिला तर ना लोकांना घरं मिळणार ना भाडं, कसा होणार आहे हा प्रोजेक्ट?” असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला आहे. डिफेन्सने विरोध केला तर मग कसा होणार आहे हा प्रोजेक्ट? पुढे अभिजीत केळकर यांनी म्हटले की, “शेजारी मिलिटरी कॅम्पस आहे, COD, त्यानुसार, ठराविक हद्दीत, ठराविक एका उंचीच्या वर इमारती बांधायला परवानगी असूच शकत नाही, जर घरं जमीनदोस्त केल्यावर, डिफेन्सने विरोध केला तर मग कसा होणार आहे हा प्रोजेक्ट?? लोकांना रोज रात्रंदिवस बिल्डरचे गुंड येऊन धमक्या देऊन घरं रिकामी करायला लावत आहेत आणि अर्धवट डॉक्युमेंट्स करून तात्काळ ही अशी अर्धवट तोडत आहेत, गेली 50-60 वर्षं तिथे राहिलेल्या पण बिल्डरला न घाबरणाऱ्या लोकांना SRA करवी, अपात्र करण्यात आलं आहे. गावगुंडांनी तिथे अनधिकृत झोपड्या बांधून त्या पात्र करून घेतल्या आहेत, हा SRA चा कारभार.” ह्याची जबाबदारी तुम्ही घेताय का? तसेच हे सगळं मी ऐकीव बोलत नाहीये, हे सगळं मी ही भोगतोय…ह्या ऊपर जाऊन मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने, तिकडच्या so called लोकप्रतिनिधींना विचारतो, आम्हाला चाळीतल्या लोकांना त्यांची हक्काची घरं मिळतील, अपात्र करण्यात आलेल्या लोकांना पात्र करतील, ह्याची जबाबदारी तुम्ही घेताय का? तसं लेखी देत असाल तर तुम्ही म्हणाल तिकडे आम्ही सह्या करू, बोला घेताय जबाबदारी? असा संताप अभिजीत केळकर यआणि व्यक्त केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *