Headlines

आरापूर-गवळीशिवरा रस्त्याचे काम रखडले:अतिक्रमण हटवण्यासाठी 10 महिन्यांपासून पत्रव्यवहार निष्फळ; प्रवाशांचे हाल




प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू असलेल्या आरापूर-गवळीशिवरा-शिल्लेगाव रस्त्याचे काम गवळीशिवरा गावाजवळील अतिक्रमणामुळे गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने येथे मोठमोठे खड्डे पडले असून, दररोज भाविक, दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागाने गंगापूर तहसील कार्यालय व गवळीशिवरा ग्रामपंचायतीकडे गेल्या दहा महिन्यांपासून वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. रस्त्यालगतची विहीर आणि संरक्षण भिंतीच्या अतिक्रमणामुळे संबंधित ठेकेदाराने गावालगतचे काम बंद पाडले आहे. गवळीशिवरा येथील श्री महारुद्र मारोती मंदिरात दर्शनासाठी वर्षभरात लाखो भाविक येतात. परंतु, प्रवेशद्वारावरील दुरावस्थेमुळे स्थानिक नागरिकांसह भाविकांची मोठी अडचण होत आहे. ग्रामविकास अधिकारी सुमय्या शेख यांनी सांगितले की, संबंधित अतिक्रमण ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येत नसून ते महसूल विभागाशी संबंधित आहे. महसूल विभागानेच तातडीने कारवाई करावी. तलाठी अमर तोरंबे म्हणाले की, संबंधित अतिक्रमणधारकांना सहा महिन्यांपूर्वीच नोटिसा बजावल्या आहेत. अतिक्रमण हटवताना तहसीलदार व नायब तहसीलदार यांची उपस्थिती आवश्यक आहे. उपअभियंता झाल्टे म्हणाले की, अतिक्रमण हटवण्याबाबत दहा महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार केला आहे. जागा मोकळी होताच तातडीने रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *