![]()
“राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती पाहता नागपूर जिल्ह्यामध्ये सिमेंट रस्ते, सुशोभीकरण किंवा जी बांधकामे दोन वर्षांनी केली तरी चालतील, अशी सर्व कामे तातडीने थांबवली जातील. जिल्हा नियोजन समितीचा (DPC) तब्बल 400 कोटी रुपयांचा संपूर्ण निधी पाणीटंचाई, विहिरींचे पुनरुज्जीवन, जलसंधारण आणि शेतरस्त्यांच्या कामांवर खर्च केला जाईल. पेंच आणि तोतलाडोह धरणातील पाण्याचे नियोजन जून 2027 पर्यंत पुरेल अशा रीतीने केले जाईल. तसेच, महसूल विभागात मोठा प्रशासकीय निर्णय घेत भूमी अभिलेख विभागातील 106 अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून, 5,000 परवानाधारक खासगी सर्व्हेअर्स नेमून जमिनीची मोजणी 15 दिवसांत पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे,” अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी दुष्काळ निवारणाचा आढावा, महसूल खात्यातील सुधारणा, विधान परिषद निवडणुकीतील पराभवाचे आत्मपरीक्षण, महायुतीमधील अंतर्गत वाद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील 12 वर्षांच्या राजकीय प्रवासावर सविस्तर भाष्य केले. 400 कोटींचा डीपीडीसी निधी दुष्काळासाठी कॅबिनेट उपसमितीचे अध्यक्ष या नात्याने दुष्काळ निवारणाचा नागपूर जिल्ह्याचा आढावा घेताना महसूलमंत्री म्हणाले, “नागपूर जिल्ह्यामध्ये डीपीसीचा 400 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. यावर्षी सिमेंट काँक्रीटचे रस्ते, सुशोभीकरण अशी दोन वर्षे पुढे ढकलता येण्यासारखी सर्व कामे पूर्णपणे थांबवली जातील. हा संपूर्ण 400 कोटींचा निधी जलसंधारण, विहिरींचे पुनर्भरण, जलजीवन मिशनच्या अपूर्ण विहिरी व नळयोजना तातडीने पूर्ण करणे, शेतरस्ते आणि पाणीटंचाईच्या उपाययोजनांवर वळवला जाईल.” जून 2027 पर्यंतचे जलव्यवस्थापन “तोतलाडोह आणि पेंच धरणातील पिण्याचे पाणी जपून वापरण्यात येईल. नागपूरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी शेजारील राज्यातून पाणी वा चारा आणण्याची गरज भासणार नाही, अशी भक्कम व्यवस्था केली जाईल. मात्र, ज्या ठिकाणी 100 लिटर पाणी दिले असता 35 लिटर पाणी गळती वा चोरीमध्ये वाया जाते, अशा अनधिकृत आणि व्यावसायिक पाणी वापरावर कडक नियंत्रण आणले जाईल.” भूमी अभिलेखमध्ये 106 अधिकाऱ्यांना पदोन्नती महसूल विभागात घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिल्यानंतर महसूल विभागातील जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख विभागाकडील 106 अधिकाऱ्यांना पदोन्नती व नव्या पदस्थापना देण्यात आल्या आहेत. हे सर्व अधिकारी सोमवारी रुजू होत आहेत. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील जमिनीच्या मोजणीचा प्रलंबित अनुशेष (बॅकलॉग) भरून निघेल.” 5,000 खासगी सर्व्हेअर्सची भरती, 35,000 रुपये मानधन “मोजणीचा अर्ज आल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत मोजणी पूर्ण झाली पाहिजे, ही सरकारची ठाम भूमिका आहे. यासाठी सध्या 1,200 सर्व्हेअर्स कार्यरत असून, लवकरच 5,000 लायसन्स (खासगी) सर्व्हेअर्स नेमले जातील. आयटीआय आणि इंजिनिअरिंगच्या तरुणांना 15 दिवसांचे रोव्हर व ड्रोनचे प्रशिक्षण देऊन प्रतिमहिना 35,000 रुपये मानधन दिले जाईल. त्यांना महिन्यातून किमान 20 मोजण्या पूर्ण कराव्या लागतील.” महायुतीतील वाचाळवीरांना मंगळवारच्या बैठकीत समज देणार विधानपरिषद निकालानंतर महायुतीमध्ये उफाळलेल्या अंतर्गत वादावर समन्वय समितीचे प्रमुख म्हणून त्यांनी भूमिका मांडली. “विधानपरिषद निवडणुकीत स्थानिक पातळीवर कमी-जास्त काम झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये व नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. मात्र येत्या मंगळवारी महायुतीची समन्वय बैठक होत असून, पक्षाची चौकट ओलांडून तोंडसुख घेणाऱ्या वाचाळवीरांना आपापल्या पक्षाकडून कडक समज दिली जाईल.” पक्षांच्या जबाबदाऱ्या निश्चित “भाजपची जबाबदारी आमची आहे, शिवसेनेची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणि राष्ट्रवादीची जबाबदारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आहे. तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र बसून हा वाद कायमचा मिटवतील.” नागपूर पदवीधर पराभवाची जबाबदारी माझी नागपूर पदवीधर मतदारसंघातील पराभवावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “नागपूर पदवीधर निवडणुकीचा प्रभारी मी स्वतः होतो. निवडणुकीत जेव्हा पराभव होतो तेव्हा त्यातून शिकलं पाहिजे. त्यामुळे या पराभवाची नैतिक जबाबदारी माझी असून मी ती स्वीकारली आहे. मागच्या निवडणुकीत संदीप जोशी यांचा पराभव झाला तेव्हा भाजपला 43,000 मते मिळाली होती; यावेळी त्यापेक्षा 23,000 मते भाजपला जास्त मिळाली आहेत. पहिल्या पसंतीचा (नंबर 1) विचार केला तर भाजपच आघाडीवर आहे. विरोधी पक्षांनी दुसऱ्या पसंतीची (नंबर 2) मते काँग्रेसला वळवल्यामुळे प्रक्रियेत आमचा पराभव झाला. सलग 5,000 ते 6,000 मते एकाच पॅटर्नने दुसऱ्या क्रमांकावर कशी गेली, यात काही षड्यंत्र होते का, याचा पक्षांतर्गत तपास केला जाईल. पुढील निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू करू.” देवेंद्र फडणवीसांचे एक तप पूर्ण; 2029 पर्यंत एनडीएच राहणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा गौरव करताना त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. “31 ऑक्टोबर 2014 रोजी 30,000 ते 40,000 जनतेच्या साक्षीने देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती. आज त्यांनी मुख्यमंत्रिपदाची यशस्वी 12 वर्षे (एक तप) पूर्ण केली आहेत. 15 वर्षे विरोधी पक्षात आणि 2029 पर्यंत 15 वर्षे सत्ताधारी पक्षाचे नेतृत्व असा 30 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे फडणवीस हे महाराष्ट्राला क्रमांक 1 वर नेणारे नेते आहेत.” विरोधकांवर हल्लाबोल करत ते म्हणाले, “रोहित पवारांना झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत सर्वच गोष्टींत फक्त भ्रष्टाचार दिसतो. कुंभमेळ्यासारख्या पवित्र परंपरेवर टीका करणे चुकीचे आहे. 2047 पर्यंत देशात पूर्ण बहुमताने एनडीएचेच सरकार राहील; टीका करणाऱ्यांचे वय संपेल पण एनडीएचा कारभार सुरूच राहील,” असे सांगत बावनकुळे यांनी राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्या विधानांचाही समाचार घेतला. ————————————————– हेही वाचा… देवेंद्रजींवर बोलताना लायकीत राहा; धंगेकरांना बन यांचा इशारा: म्हणाले- कालपर्यंत व्हिलन वाटणारा विजय मल्ल्या राऊतांना आज महात्मा कसा वाटू लागला? “पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात जेव्हा तपास यंत्रणांनी अटक केली होती, तेव्हा ‘मी काय विजय मल्ल्या आहे का?’ असा सवाल विचारणारे संजय राऊत आज आपल्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकातून त्याच विजय मल्ल्याला थेट महात्मा ठरवण्याचा हास्यास्पद प्रयत्न करत आहेत. बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवणाऱ्या मल्ल्यामध्ये आणि मुंबईतील पत्राचाळीत मराठी माणसाची घरे बुडवणाऱ्या संजय राऊतांमध्ये काहीही फरक नाही, दोघांचेही कॅरेक्टर एकच आहे. कालपर्यंत पवार साहेबांची आणि राहुल गांधींची वकिली करणारे राऊत आता विजय मल्ल्यांची वकिली करत आहेत; यासाठी त्यांनी नेमकी कोणती डील केली आहे? या पुस्तकाचे नाव ‘बोध कीर्तन’ ठेवण्यापेक्षा ‘बाळबोध नर्तन’ ठेवले असते तर ते अधिक शोभून दिसले असते,” असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
महायुतीतील 'वाचाळवीरांना' मंगळवारी समज देणार:चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले- सिमेंट रस्ते, सुशोभीकरण थांबवून 400 कोटींचा संपूर्ण निधी दुष्काळासाठी