Headlines

अपघातग्रस्तांना मदत देण्याची अमोल बालवडकरांची मागणी:मृतांच्या वारसांना 10 लाख, गंभीर जखमींना 5 लाख; किरकोळ जखमींना २ लाख देण्याचा प्रस्ताव




पुणे महापालिका हद्दीत अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांपर्यंत, गंभीर जखमी किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्यांना ५ लाख रुपयांपर्यंत मदत द्यावी, अशी मागणी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केली आहे. अपघातग्रस्तांना तातडीने आर्थिक आणि वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी महापालिकेने स्वतंत्र धोरण तयार करावे, असे त्यांनी म्हटले आहे. महापालिका हद्दीत रस्ते अपघातांसह रस्ते, पदपथ, नाले, बांधकामे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी अपघात होतात. यात काही नागरिकांचा मृत्यू होतो, तर काही जण गंभीर जखमी होतात. अशा वेळी उपचारांचा खर्च कुटुंबीयांना सहन करावा लागतो. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आर्थिक संकटही येते. नुकसानभरपाईच्या कायदेशीर प्रक्रियेची वाट न पाहता अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळावी, यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे बालवडकर यांनी म्हटले आहे. प्रस्तावानुसार, अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना १० लाख रुपयांपर्यंत मदत द्यावी. गंभीर दुखापत किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ५ लाख रुपये, तर किरकोळ जखमींना २ लाख रुपयांपर्यंत मदत देण्याची सूचना आहे. अत्यंत गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना तातडीच्या उपचारांसाठी १ लाख रुपयांपर्यंत अंतरिम मदत देण्याची मागणीही केली आहे. मदतीसाठी पोलिस नोंद किंवा प्रथम माहिती अहवाल (एफआयआर), वैद्यकीय प्रमाणपत्र आणि रुग्णालयातील उपचारांची कागदपत्रे तपासण्याची कार्यपद्धती तयार करण्याचा प्रस्ताव आहे. मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र आणि कायदेशीर वारसांची कागदपत्रे तपासून मदत मंजूर करावी, असेही सुचवले आहे. अर्ज मिळाल्यानंतर शक्यतो १५ दिवसांत निर्णय घ्यावा आणि अत्यंत गंभीर प्रकरणांत तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावाला महापालिका प्रशासनाची मंजुरी मिळाली आहे की नाही, याबाबत स्पष्टता नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *