![]()
हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगरदरम्यानची पुणे मेट्रो लाईन-३ ४ नोव्हेंबरपासून प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. गर्दीच्या वेळेत दर ६ मिनिटांनी, तर इतर वेळी दर १२ मिनिटांनी मेट्रो धावेल. पहिली फेरी सकाळी ६ वाजता सुटेल. या मार्गाचे लोकार्पण ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन होणार आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सकाळी १०.३० वाजता कार्यक्रम होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार उपस्थित राहणार आहेत. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २३.२०३ किलोमीटरच्या मार्गावर एकूण २३ स्थानके आहेत. सुरुवातीला १७ स्थानके प्रवाशांसाठी खुली केली जातील. माण ते शिवाजीनगर मार्गावरील सात स्थानकांवर सुरुवातीला एकच जिना खुला असेल. उर्वरित सहा स्थानकांपैकी दोन स्थानकांचे काम नोव्हेंबरअखेर, तर अन्य चार स्थानकांचे काम जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सर्व स्थानकांवरील सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू होतील. माण स्थानकावरून जिल्हा न्यायालयाच्या दिशेने जाणारी शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता सुटेल. जिल्हा न्यायालयातून माणच्या दिशेने जाणारी शेवटची मेट्रो रात्री ११.४० वाजता सुटेल. जिल्हा न्यायालय स्थानकावर या मार्गाची जोडणी महामेट्रोच्या पिंपरी-चिंचवड–स्वारगेट आणि वनाज–रामवाडी मार्गांशी होईल. तिन्ही मार्गांवर प्रवासासाठी संयुक्त तिकीट ॲप तयार करण्यात आले आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ८,३१३ कोटी रुपये आहे. तो सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उभारण्यात आला आहे. मेट्रो स्थानके आणि कार डेपोमध्ये ७.६० मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता तयार केली आहे. यातून प्रकल्पाच्या सुमारे ३० टक्के वीज गरजेची पूर्तता होईल. या मार्गामुळे हिंजवडी, बाणेर, बालेवाडी, औंध आणि शिवाजीनगर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. दररोज दोन ते अडीच लाख प्रवासी या सेवेचा लाभ घेतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे.
Source link
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो 4 नोव्हेंबरपासून धावणार:गर्दीच्या वेळेत दर 6 मिनिटांनी फेरी; पहिली मेट्रो सकाळी 6 वाजता