Headlines

राष्ट्रीय एकात्मतेसाठी धावले 4500 अकोलेकर:‘डिजिटल एकता अन् सुरक्षित भविष्य’ घोषवाक्यावर भव्य एकता दौड




भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आणि ‘राष्ट्रीय एकता दिना’चे औचित्य साधून अकोला जिल्हा पोलिस दलाच्या ‘मिशन उडान’ उपक्रमांतर्गत अकोला शहरातून शनिवारी (दि. ३१) ‘रन फॉर युनिटी’ काढण्यात आली. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या दौडीचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात ४,५०० हून अधिक नागरिकांनी सहभागी होत धावून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. गतवर्षी सुमारे चार हजार अकोलेकर सहभागी झाले होते. यंदा त्यात पाचशेंची वाढ झाली. याप्रसंगी अकोला महानगरपालिकेचे आयुक्त सुनील लहाने, सौम्या चांडक (आयएएस), प्रभारी अपर पोलिस अधीक्षक डॉ. निलेश पांडे (प्राचार्य, पीटीएस अकोला), वरिष्ठ पोलिस अधिकारी, अंमलदार, विविध शासकीय विभागांचे कर्मचारी, विद्यार्थी, युवक-युवती आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीपर गीते, ‘झुंबा’ने वाढवला उत्साह : ही एकता दौड सकाळी ६ वाजता अकोला पोलिस मुख्यालयातून सुरू झाली. तेथून सरकारी बगीचा, जिल्हाधिकारी कार्यालय, अशोक वाटिका, पोलिस अधीक्षक कार्यालय आणि निमवाडी पोलिस वसाहत मार्गे ही दौड पुन्हा पोलिस मुख्यालयात पोहोचली. संपूर्ण मार्गावर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी विशेष ‘झुंबा’ सत्राचेही यावेळी आयोजन करण्यात आले. जनजागृती, सामाजिक सद्भावाचा संदेश ‘डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य’ हे या एकता दौडीचे मुख्य घोषवाक्य होते. या कार्यक्रमात सायबर सुरक्षा, डायल ११२, दामिनी पथक, भरोसा सेल, नशामुक्त भारत, ऑपरेशन प्रहार, मिशन उडान व नवीन कायद्यांविषयी जनजागृती करणारे माहिती फलक आणि सेल्फी स्टँड्स उभारण्यात आले होते. “जात, धर्म, भाषा व प्रांताच्या पलीकडे जाऊन आपण सर्व प्रथम भारतीय आहोत’, असा सामाजिक सद्भाव व आरोग्याचा संदेश देत अकोला जिल्हा पोलिस दलाच्या या रन फॉर युनिटीची, सायबर जनजागृती महिन्याची उत्साहात सांगता झाली. विशेष व्यवस्था व पुष्पवृष्टी दौडच्या मार्गावर अशोक वाटिका आणि जेल चौकात धावपटूंवर पुष्पवृष्टी करण्यात आली. सहभागी नागरिकांसाठी ठिकठिकाणी लिंबूपाणी व अल्पोपाहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती, तसेच दौड यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व धावपटूंना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *