![]()
येथील जलालपुरा भागातील जैन परिवार मागील ७४ वर्षांपासून मोठ्या देवीच्या भक्तीची परंपरा जपत आहे. मोठ्या देवीचा महाप्रसाद ही फक्त प्रसादाची तयारी नाही. तीन पिढ्यांच्या समर्पणाचा, त्यागाचा, निष्ठेचा पुरावा आहे. सन १९५५ पासून ही सेवा सुरू आहे. कोरोनाच्या दोन वर्षांचा अपवाद वगळता परंपरा एकही वर्ष खंडित झाली नाही. मनसुखभाईंच्या वृद्धत्वानंतर सुपुत्र रमणिकभाई जैन यांनी बंधू शशिकांतभाई, प्रवीणभाई, किशोरभाई यांच्यासह जबाबदारी स्वीकारली. सन १९७६ ते २००० या काळात या भावंडांनी कोणताही मोबदला न घेता देवीची सेवा केली. “महाप्रसाद बनवणं म्हणजे देवीला अर्पण करणं,” असं ते म्हणत. सन २००० ते २०१६ दरम्यान निलेश शशिकांत जैन आणि मनोज रमणिकलाल जैन यांनी कार्यभार सांभाळला. २०१६ नंतर आजतागायत संजय जैन, पंकज जैन, प्रवीण जैन आणि त्यांचे सुपुत्र रोहित जैन ही परंपरा पुढे नेत आहेत. दरवर्षी मोठ्या देवीच्या उत्सवकाळात हे सर्वजण दोन दिवस सतत काम करून महाप्रसाद तयार करतात. या परिवारातील पंकज रमणिकलाल जैन या काळात पायात चप्पल घालत नाहीत. उपवास करतात. सेवा म्हणजे साधना आहे, असं ते सांगतात. देवीच्या भोजन समितीच्या सदस्यांच्या परवानगीशिवाय आम्ही महाप्रसाद घरी नेत नाही, असंही ते म्हणाले. ३३ क्विंटल गव्हाची पोळी, ३ हजार किलोची काशी फळाची भाजी,व मसाला भाजीसाठी २२ डबे शेंगदाण्याचे तेल, ५ क्विंटल चा मसाले भात, ३५० किलो बेसन, ७ क्विंटल साखर व २१ डबे गावरान तूप यातून बुंदी तयार करण्यात आली. हा महाप्रसाद रोहित जैन, संजय जैन व त्यांच्या सहकारी आचार्यांनी केले तर महिला सेवेकऱ्यांनी पोळ्या तयार केल्या.
Source link
जैन परिवाराची 74 वर्षांची प्रसादरूपी सेवा:मोठ्या देवीची तीन पिढ्यांपासून केली जातेय समर्पणाने सेवा ; परिवाराची सोबत