![]()
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. ऊस दराचा प्रश्न अद्याप मार्गी लागत नसल्याने संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांसह सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्यावर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन बेमुदत स्वरूपाचे असेल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे. त्यामुळे ऊस दराच्या प्रश्नावर आता संघर्ष तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांतील गावांचा दौरा केला. दत्तवाड, अब्दुललाट, आकिवाट, शिरटी, बुबनाळ, नांदणी, उदगाव, कोथळी, दानोळी, नरंदे, आळते आणि रुई या गावांमध्ये त्यांनी गावभेटी देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. विविध ठिकाणी कोपरा सभा घेऊन ऊस दराच्या प्रश्नावर संघटनेची भूमिका मांडली. या सभांना शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला. आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. साखरेचे दर वाढले, मग शेतकऱ्यांना वाढीव दर का नाही? साखर कारखान्यांना साखर आणि उपपदार्थांच्या विक्रीतून चांगले उत्पन्न मिळत असताना ऊस उत्पादकांना त्यांच्या उसाचा योग्य मोबदला देण्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. खुल्या बाजारात साखरेचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर साखर उत्पादन प्रक्रियेतून मिळणाऱ्या बगॅस आणि मोलॅसिस या उपपदार्थांनाही चांगला दर मिळत आहे. कारखान्यांच्या उत्पन्नाचे विविध स्रोत वाढत असताना शेतकऱ्यांच्या उसाच्या दरात अपेक्षित वाढ का केली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. साखर कारखानदार आणि सरकार यांच्यातील संगनमतामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. कारखान्यांच्या आर्थिक व्यवहारात शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य मिळत नसल्याची टीका करत, उसाच्या उत्पादनासाठी घेतलेल्या मेहनतीचा आणि खर्चाचा योग्य मोबदला मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महागाई आणि दुष्काळाच्या दुहेरी संकटात शेतकरी राज्यातील शेतकरी सध्या अनेक आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि इंधन यांच्या खर्चात वाढ झाली आहे. दुसरीकडे पावसातील अनिश्चितता आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतीचे आर्थिक गणित बिघडले आहे. उत्पादन खर्च वाढत असताना शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण वाढत असल्याचे शेट्टी यांनी सभांमधून सांगितले. अशा परिस्थितीत ऊस उत्पादकांनी आपल्या हक्काच्या दरासाठी संघटित होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आता केवळ मागण्या करून थांबण्याऐवजी त्यासाठी प्रत्यक्ष संघर्षात उतरले पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक सुरूच राहील, असे मत त्यांनी व्यक्त केले. 3 नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा किणी टोल नाक्यावर होणारे आंदोलन हे केवळ प्रतीकात्मक किंवा एक दिवसाचे आंदोलन नसून शेतकऱ्यांच्या हक्कासाठीची निर्णायक लढाई असेल, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार असून, मागण्यांबाबत ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. विशेषतः शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक गावातून शेतकऱ्यांनी एकजुटीने किणी टोल नाक्यावर पोहोचावे, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांच्या गावभेटी आणि कोपरा सभांमुळे ऊस दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 3 नोव्हेंबरच्या आंदोलनाला किती मोठा प्रतिसाद मिळतो आणि त्यानंतर सरकार व साखर कारखानदारांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा….. ‘पाणी, चारा आणि नागरिकांच्या हाताला काम द्या’:शरद पवारांकडून दुष्काळग्रस्त भागांची पाहणी; सोलापूर, धाराशिवमध्ये टँकरच्या स्थितीचा आढावा राज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार स्थानिक आमदारांसोबत पंढरपूर तालुक्यातील दुधाळी, सोलापूर, भूम-परंडा आणि धाराशिव या भागांचा दौरा करत आहेत. या जिल्ह्यांमधील टँकर आणि पाण्याच्या गंभीर परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी दुष्काळाचे भीषण वास्तव समोर आणले असून, प्रशासनाकडून घेतलेल्या प्राथमिक माहितीनुसार सध्या तिथे पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि नागरिकांच्या हाताला काम देण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सविस्तर वाचा….
Source link
ऊस दरावरून राजू शेट्टी आक्रमक:3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर रास्ता रोको, हजारो शेतकरी उतरणार रस्त्यावर