![]()
बदलते हवामान आणि दुष्काळाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ‘वर्क फोर्स ऑन वॉटर’सारखे उपक्रम सुरू करण्याची गरज आहे. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी प्रत्येक कृषी महाविद्यालयात जैविक निविष्ठा उत्पादन केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाधारित शिक्षण देण्यासह शेतकरीहिताचे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. विद्यापीठात प्रथमच आयोजित दोन दिवसीय शैक्षणिक आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील व नियंत्रक डॉ. सचिनकुमार नांदगुडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी ‘एक विद्यार्थी–एक झाड’ आणि ‘एक विद्यार्थी–एक शेतकरी’ हे उपक्रम राबविण्यात येतील. विद्यापीठाचे कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात ‘फुले कृषी माहिती व शेतकरी सन्मान कक्ष’ स्थापन केला जाणार आहे. महिला शेतकरी आणि शास्त्रज्ञांमधील संवाद वाढविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘सावित्रीबाई फुले महिला शेतकरी-शास्त्रज्ञ मंच’ उभारण्यात येणार आहे. ‘फुले समृद्ध गाव’ अभियानांतर्गत विद्यार्थी व प्राध्यापक गावांमध्ये जाऊन कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करतील. स्थानिक हवामान व गरजांनुसार एकात्मिक शेतीचे प्रात्यक्षिक घटक विकसित केले जातील. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी समुपदेशन, आरोग्य व सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रमही राबविण्यात येतील.
Source link
प्रत्येक कृषी महाविद्यालयामध्ये जैविक निविष्ठा उत्पादन केंद्राची उभारणी करू:‘एक विद्यार्थी–एक झाड’ उपक्रम राबवणार- कुलगुरू डॉ. विलास खर्चे