Headlines

पाकिस्तानात 400 ला बियाणे, भारतात 2000 ला विक्री:शेतकरी नेते जावंधियांचे मोदींना पत्र, बियाण्यांच्या किमतीतील तफावतीवर प्रश्न




भारतातील कापूस उत्पादक शेतकरी बियाण्यांच्या किमतीतील मोठ्या तफावतीमुळे अडचणीत आले आहेत. पाकिस्तानात जिथे अधिक प्रगत कापूस बियाणे सुमारे 400 प्रति किलो दराने उपलब्ध आहे, तिथे भारतीय शेतकऱ्यांना त्याच तंत्रज्ञानातील कमी पर्यायासाठी 2000 प्रति किलो मोजावे लागत आहेत. या अन्यायावर शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आवाज उठवला आहे. जावंधिया यांनी पत्रात नमूद केले आहे की, भारतात शेतकऱ्यांना सध्या दोन जीनयुक्त (सीआरवाय-1एसी+सीआरवाय-2एबी) बीटी कापूस बियाणे सुमारे 2000 प्रति किलोने मिळते. याउलट, पाकिस्तानमध्ये तीन जीनयुक्त (सीआरवाय-1एसी+सीआरवाय-2एबी+सीपी-4इपीएसपीएस) बियाणे केवळ सुमारे ₹400 प्रति किलो दराने उपलब्ध आहे. कमी किमतीत अधिक प्रगत बियाणे मिळत असल्याने ही तफावत भारतीय शेतकऱ्यांसाठी धक्कादायक आहे. या पत्रात “स्ट्रेट लाईन” (नॉन-हायब्रिड) कापूस बियाण्यांचा मुद्दाही अधोरेखित करण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये अशा बियाण्यांचा वापर यशस्वीपणे होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. भारतात मात्र संकरित (हायब्रिड) बियाण्यांवर अवलंबित्व कायम असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी नव्याने बियाणे खरेदी करावे लागते. विजय जावंधिया यांनी 2015 मध्येही केंद्र सरकारला पत्र लिहून “स्ट्रेट लाईन” बियाण्यांची मागणी केली होती. त्यावेळी सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला तरी, प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. 11 वर्षांनंतरही परिस्थिती जैसे थे असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच, भारतात संकरित कापसाच्या नावाखाली एफ-1 ऐवजी एफ-2 बियाणे दिले जात असल्याची चर्चा असून, यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर धोरणांची गरज असल्याचेही पत्रात म्हटले आहे. कापूस उत्पादनातील वाढते खर्च, बियाण्यांच्या किमतीतील तफावत आणि तंत्रज्ञानातील असमतोल यामुळे भारतीय शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे बियाण्यांच्या किमतीवर नियंत्रण, “स्ट्रेट लाईन” बियाण्यांचा विकास आणि खाजगी कंपन्यांच्या प्रभावावर लगाम घालण्याची मागणी आता जोर धरत आहे. या गंभीर प्रश्नावर केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी जावंधिया यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *