Headlines

भाजपने महाराष्ट्राची चिंता करू नये:मोदींना पळून जाऊ देणार नाही, त्यांच्यावर खटले चालणार, त्यांच्यासह सर्व जेलमध्ये जाणार- संजय राऊत




भाजपने महाराष्ट्राची चिंता करू नये. त्यांनी जर खरोखरच महाराष्ट्राची चिंता केली असती, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना फोडली नसती, असा जोरदार घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. चलो दिल्ली रॅलीच्या यशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्रातील नेत्यांना रामलीला मैदानावरील सभेत बोलण्याची संधी मिळाली नाही, या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना संजय राऊत म्हणाले की, रामलीला मैदानावर कार्यकर्त्यांची गर्दी प्रचंड वाढली होती. रेटा वाढल्यामुळे गर्दी थेट स्टेजपर्यंत सरकत आली होती. लोक सकाळी 8 वाजेपासून येऊन बसले होते. त्यामुळे आम्ही के. सी. वेणुगोपाल यांना राहुल गांधींचे भाषण सुरू करण्याची विनंती केली, जेणेकरून सभा वेळेत संपेल. अंधभक्तांना बाहेरचे दिसत नाही संजय राऊत म्हणाले की, देशातील जनता आता नरेंद्र मोदींच्या विरोधात उभी राहिली आहे. अंधभक्तांच्या रॅलीला आता कोणीही प्रतिसाद देणार नाही. अंधभक्तांना बाहेर काय सुरू आहे आणि काय बोलले जात आहे, हे दिसतही नाही आणि ऐकूही येत नाही. त्यांना अशा नवनवीन घोषणा नेमक्या सुचतात तरी कुठून, हेच समजत नाही. मोदी इथेच राहतील, आम्ही त्यांना कुठेही पळून जाऊ देणार नाही. त्यांच्यावर खटले चालतील आणि मोदींसह त्यांची संपूर्ण कंपनी कारागृहात जाईल. राहुल गांधींना पंतप्रधान करायचे की नाही, हे जनता ठरवेल संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे की नाही, हे जनता ठरवणार आहे, अमित शहा नाहीत, असा टोला लगावत राऊत म्हणाले, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात की, जनतेने निवडून दिलेले सरकार सहजासहजी हलवता येणार नाही. आमचा नेमका याच गोष्टीवर आक्षेप आहे. हे सरकार जनतेने निवडून दिलेले नसून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मेहरबानीने सत्तेवर आले आहे. म्हणूनच ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवणे गरजेचे आहे. बांगलादेशी घुसखोरीवरून शहांच्या राजीनाम्याची मागणी संजय राऊत म्हणाले की, बांगलादेशची लोकसंख्या 15 कोटी आहे. त्यातील साडेतेरा कोटी घुसखोर जर भारतात आले असतील, तर हे थेट गृहमंत्री अमित शहा यांचे अपयश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांची तात्काळ हकालपट्टी केली पाहिजे. अमित शहा गृहमंत्री असताना हे घुसखोर देशात राहतातच कसे?. 1974 च्या जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापेक्षाही कालची रॅली मोठी संजय राऊत म्हणाले की, जयप्रकाश नारायण यांनी 1974 मध्ये रामलीला मैदानावरून लोकशाहीच्यारक्षणार्थ देशवासीयांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. राजकीय विश्लेषकांच्या मते, काल झालेली रॅली ही 1974 च्या आंदोलनापेक्षाही मोठी आणि ऐतिहासिक होती. संविधान आणि घटनात्मक संस्था वाचवण्यासाठी जयप्रकाश नारायण यांनी जे आवाहन केले होते, त्याच मागण्यांसाठी काल राहुल गांधी यांच्यासह आम्ही सर्वांनी एकत्र येत आंदोलन केले. भाजपची नजर कमजोर, डोळे बदलावे लागतील संजय राऊत म्हणाले की, भाजपची नजर कमजोर झाली आहे, त्यांना जवळचे आणि दूरचे काहीच दिसत नाही. त्यामुळे आधी त्यांचे डोळे बदलावे लागतील. काल रामलीला मैदानावर जनसागर लोटला होता, तर तितकीच गर्दी अमित शहा यांनी अनेक ठिकाणी अडवून ठेवली होती. कालची ‘चलो दिल्ली’ रॅली अत्यंत यशस्वी झाली असून, ज्ञानेश कुमार, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सत्ता सोडावीच लागणार, हा स्पष्ट संदेश कालच्या आंदोलनातून देण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *