![]()
पुण्यात वाकड ब्रिज ते चांदणी चौकादरम्यान मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्यांचे वारंवार नुकसान झाले. १६, १७ आणि ३१ ऑक्टोबरला केबलचे नुकसान झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. याप्रकरणी महावितरणने संबंधित कंत्राटदाराविरोधात बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वीजवाहिन्यांचे सुरक्षित स्थलांतर करण्यापूर्वी काम सुरू ठेवल्याचा आक्षेप महावितरणने घेतला आहे. केबल दुरुस्ती आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्राहकांची गैरसोय झाली आणि महावितरणच्या महसुलावरही परिणाम झाला. महामार्गाच्या रुंदीकरणासह सेवा रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिन्या नियमानुसार स्थलांतरित करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेने महावितरणकडून अंदाजपत्रक मंजूर करून घेऊन पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी घेतली आहे. मात्र, पुणे महापालिका हद्दीतील कामासाठी परवानगी घेतलेली नाही, असे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पूर्वसूचना देऊनही काम सुरू ठेवल्याने केबलचे नुकसान होत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. १६ ऑक्टोबरला २२ केव्ही बेव्हर्ली फिडरची केबल तोडण्यात आली. १७ ऑक्टोबरला बिटवाइज चौक परिसरात २२ केव्ही निया फिडरच्या केबलचे नुकसान झाले. ३१ ऑक्टोबरलाही केबल नादुरुस्त झाली. त्यानंतरही अशा घटना सुरू असल्याचे महावितरणने म्हटले आहे. या मार्गावरील २२ केव्ही उच्चदाब आणि लघुदाब भूमिगत वीजवाहिन्यांचे नियोजन न करता रस्त्याचे काम पूर्ण केल्यास भविष्यात अडचणी येऊ शकतात. वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास औंध, बाणेर आणि महाळुंगे परिसरातील अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामापूर्वी वाहिन्यांची जागा निश्चित करून त्यांचे सुरक्षित स्थलांतर करणे आवश्यक आहे. रुंदीकरणानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या वीजवाहिन्या रस्त्याच्या मधोमध येऊ शकतात किंवा काँक्रीटखाली गाडल्या जाऊ शकतात. अशा वेळी केबलमधील बिघाड शोधणे आणि दुरुस्ती करणे कठीण होईल. काँक्रीटचा रस्ता खोदावा लागल्यास दुरुस्तीला उशीर होऊन अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊ शकतो, असे महावितरणने म्हटले आहे.
Source link
महामार्गाच्या कामात भूमिगत वीजवाहिन्यांचे नुकसान:महावितरणची तक्रार; वाकड ब्रिज ते चांदणी चौकादरम्यान कंत्राटदाराने वारंवार सूचना देऊनही काम सुरू ठेवल्याचा आरोप