Headlines

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर महामंडळ सक्रिय:सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 15 दिवसांत आढावा बैठका घेण्याचे निर्देश; आरोग्य, शिक्षण, निवारा आणि मजुरीच्या प्रश्नांवर लक्ष




विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्यानंतर ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सक्रिय झाले आहे. आगामी ऊस गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना १५ दिवसांत जिल्हास्तरीय आढावा बैठका घेऊन कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका दीपा मुधोळ-मुंडे यांनी यासंदर्भात पत्र जारी केले. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या विभागांतर्गत असलेल्या महामंडळाने आरोग्य, समाजकल्याण, कामगार, शिक्षण, महिला व बालविकास, पोलीस आणि अन्न व नागरी पुरवठा विभागांचे अधिकारी, साखर कारखाने आणि कामगार प्रतिनिधी यांच्या सहभागातून संयुक्त बैठक घेण्यास सांगितले आहे. डॉ. गोऱ्हे यांनी १९ ऑक्टोबर रोजी समाजकल्याण आयुक्तांना पत्र पाठवून कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधले होते. महिला कामगारांच्या आरोग्य तपासण्या, गर्भवती आणि स्तनदा मातांची काळजी तसेच अनावश्यक गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांना प्रतिबंध करण्याची गरज त्यांनी मांडली होती. अशा शस्त्रक्रिया झालेल्या महिलांच्या आरोग्याचा नियमित पाठपुरावा करण्याची मागणीही केली आहे. कामगारांच्या निवासस्थानी शुद्ध पाणी, वीज, सुरक्षित निवारा आणि स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यावर भर देण्यात आला आहे. पात्र कामगारांना रेशन देण्याचाही मुद्दा आहे. स्थलांतरामुळे मुलांचे शिक्षण थांबू नये, यासाठी शाळाप्रवेश, वाहतूक, पोषण आहार आणि वसतिगृहांच्या सुविधांबाबत उपाययोजना अपेक्षित आहेत. कामगारांची नोंदणी, विमा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ, थकीत मजुरी, मुकादमांचे कमिशन तसेच अपघातग्रस्तांना नुकसानभरपाई या मुद्द्यांचाही बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. जिल्हास्तरीय बैठका आणि अहवालांनंतर या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते, याकडे लक्ष असेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *