Headlines

जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून संपूर्ण परिसराची तपासणी:अखेर ई-मेलमधील धमकी खोटी असल्याचे निष्पन्न




सातारा जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने सोमवारी सकाळी न्यायालय परिसरात मोठी खळबळ उडाली. या धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने संपूर्ण न्यायालय परिसराची तपासणी सुरू केली. तब्बल चार तास चाललेल्या या शोधमोहिमेत न्यायालयाची इमारत, परिसरातील प्रत्येक भाग तसेच बाहेर उभी असलेली वाहने तपासण्यात आली. मात्र, या तपासणीत कोणतीही बॉम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे ही धमकी खोटी असल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे सातारा जिल्हा न्यायालयाचे कामकाज सुरू झाले होते. न्यायाधीश, वकील, न्यायालयीन प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच विविध प्रकरणांच्या सुनावणीसाठी आलेले पक्षकार यांच्यामुळे न्यायालय परिसरात नेहमीप्रमाणे वर्दळ होती. अशातच सकाळी सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास न्यायालय प्रशासनाला एक ई-मेल प्राप्त झाला. पंजाबी भाषेशी साधर्म्य असलेल्या भाषेत लिहिलेल्या या ई-मेलमध्ये सातारा जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणाला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. कोणताही धोका पत्करू नये म्हणून तातडीने सातारा पोलिसांना याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक आणि सातारा शहर पोलिसांचा मोठा फौजफाटा न्यायालय परिसरात दाखल झाला. न्यायालयातील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर सर्वप्रथम न्यायालयातील नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. न्यायालयात उपस्थित असलेले न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर न्यायालय परिसर रिकामा करून पोलिसांनी संपूर्ण भागात प्रवेश नियंत्रित केला. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळू नये, यासाठी परिसराची नाकेबंदी करून तपासणी सुरू करण्यात आली. बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाने न्यायालयाच्या इमारतीतील विविध विभाग, खोल्या, दालने, जिने आणि परिसरातील प्रत्येक भागाची बारकाईने तपासणी केली. यासोबतच न्यायालयाच्या बाहेर पार्क करण्यात आलेल्या वाहनांचीही तपासणी करण्यात आली. ई-मेलमधील धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोणतीही बाब दुर्लक्षित न करता संपूर्ण परिसर पिंजून काढला. दीड तासांत प्राथमिक तपासणी पूर्ण; तरीही शोधमोहीम सुरूच पोलिसांनी सुरुवातीच्या दीड तासांत संपूर्ण न्यायालय परिसरात शोधमोहीम राबवली. या प्राथमिक तपासणीत कुठेही बॉम्ब किंवा बॉम्बसदृश संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. मात्र, धमकीची गंभीरता लक्षात घेता केवळ प्राथमिक तपासणीवर समाधान न मानता संपूर्ण परिसराची आणखी दोन वेळा तपासणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. त्यानुसार बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाने पुन्हा एकदा न्यायालयाच्या सर्व भागांची तपासणी केली. दुपारी साडेचार वाजेपर्यंत पोलिसांची शोधमोहीम सुरू होती. अखेर संपूर्ण तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याने न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी खोटी असल्याचे समोर आले. दरम्यान, धमकीचा ई-मेल नेमका कोठून आणि कोणी पाठवला, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास केला जाण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *