![]()
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षातील नेत्यांमध्ये कोणतीही नाराजी नसून, मुंबईत झालेली बैठक ही पक्षाची आगामी भूमिका, संघटनात्मक बांधणी आणि भविष्यातील वाटचाल यासंदर्भात होती, अशी माहिती तटकरे यांनी दिली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत झालेली भेटही पूर्वनियोजित होती, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना वेगळे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे, तीन ते पाच वेळा निवडून आलेल्या पक्षातील प्रमुख नेत्यांशी संवाद साधण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आगामी काळात पक्षाची भूमिका काय असावी, संघटनात्मक पातळीवर कोणत्या गोष्टींवर भर द्यावा आणि पक्षाचा विस्तार कसा करावा, याबाबत बैठकीत विचारविनिमय झाल्याचे तटकरे यांनी सांगितले. पक्षात कोणतीही नाराजी नाही; तटकरेंनी चर्चांना दिले उत्तर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. विशेषतः दिल्लीतील अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर या चर्चांना अधिक वेग आला होता. पक्षातील काही नेते नाराज असल्याच्या तसेच महत्त्वाच्या निर्णयांवरून मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या सर्व चर्चा तटकरेंनी फेटाळून लावल्या. पक्षात कुठेही नाराजी नसल्याचे स्पष्ट करत, आजची बैठक ही पूर्णपणे पक्षाच्या संघटनात्मक आणि राजकीय वाटचालीच्या दृष्टीने आयोजित करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. पक्षातील आमदार आणि प्रमुख नेत्यांची मते जाणून घेण्याची प्रक्रिया यापूर्वीही सुरू होती. अजित पवार असतानाही अशा बैठका घेतल्या जात होत्या. मात्र, मध्यंतरी पक्षाचे प्रमुख नेते विविध कामांमध्ये व्यस्त असल्याने या बैठका होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आता पुन्हा सर्वांशी संवाद साधण्यावर भर दिला जात असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. उद्याही आमदारांची बैठक; नेत्यांची मते जाणून घेणार आजच्या बैठकीनंतर उद्या पक्षातील सर्व आमदारांची स्वतंत्र बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत आमदारांची मते जाणून घेतली जाणार आहेत. पक्षाच्या आगामी राजकीय रणनीतीसह संघटनात्मक कामकाजाबाबत आमदारांशी चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत सर्व प्रमुख नेत्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असल्याचे तटकरे यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. पक्षातील नेत्यांशी नियमित संवाद साधणे आणि त्यांच्या सूचना जाणून घेणे, हा या बैठकांचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही प्रकारच्या नियुक्त्यांवरून किंवा अंतर्गत निर्णयांवरून नाराजी असल्याचे वृत्तही त्यांनी नाकारले. विलीनीकरणाची चर्चा थांबली; दिल्लीतील बैठक नियोजितच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चाही गेल्या काही काळापासून राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र, विलीनीकरणासंदर्भातील चर्चा यापूर्वीच थांबली असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सध्या पक्षाच्या पातळीवर विलीनीकरणाचा कोणताही नवा निर्णय झालेला नसल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये दिल्लीत झालेल्या भेटीवरही तटकरे यांनी भूमिका मांडली. ही भेट आधीपासून नियोजित होती. त्याला पक्षांतर्गत नाराजी किंवा मतभेदांचा रंग देणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. सुनेत्रा पवारांच्या सूचनेनुसारच अमित शाह यांची भेट दरम्यान, दिल्लीतील अमित शाह यांच्या भेटीवरून सुरू असलेल्या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते उमेश पवार यांनीही उत्तर दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीला अनावश्यक राजकीय रंग देऊन पक्षांतर्गत मतभेदांचे कथानक तयार करण्याचा प्रयत्न दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. सुनेत्रा पवार यांनीच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे एक शिष्टमंडळ अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांना दिली होती. तसेच या भेटीसाठी वेळ उपलब्ध करून देण्याची विनंतीही करण्यात आली होती. त्यामुळे दिल्लीतील ही भेट सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार आणि पूर्वनियोजनातूनच झाल्याचे उमेश पवार यांनी स्पष्ट केले. बैठकीला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित मुंबईत झालेल्या या महत्त्वाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला पक्षातील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांचा समावेश होता. या बैठकीत पक्षाची पुढील दिशा, संघटनात्मक बांधणी आणि आगामी काळातील राजकीय भूमिका यावर चर्चा झाली. दिल्लीतील अमित शाह यांच्यासोबत झालेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवरही बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. शरद पवारांच्या प्रकृतीबाबतही तटकरेंनी व्यक्त केली चिंता या पत्रकार परिषदेत सुनील तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतही प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे गेल्या सहा दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत. यापूर्वीही त्यांनी मोठ्या आजारावर मात केली आहे. दुष्काळी परिस्थितीनंतर त्यांनी दौरे सुरू केले होते. मात्र, नुकतेच त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली. त्यांचे जनतेशी असलेले नाते आणि लोकांप्रती असलेली आपुलकी पाहता त्यांनी लवकर बरे व्हावे, अशी आमचीही इच्छा असल्याचे तटकरे म्हणाले. एकूणच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीनंतर पक्षातील नाराजीच्या चर्चांना तटकरेंनी नकार दिला आहे. दिल्लीतील अमित शाह यांची भेट पूर्वनियोजित असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आता उद्या होणाऱ्या आमदारांच्या बैठकीत कोणते मुद्दे समोर येतात आणि पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत काय निर्णय घेतले जातात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. टोरंट प्रकल्पावरून राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेत संघर्ष:सुनील तटकरे तुमच्यासारखे मीटिंग घेऊन सेटिंग करणारे नाहीत’, म्हणत अनिकेत तटकरेंचा महेंद्र थोरवेंवर निशाणा रायगड जिल्ह्यात विकास प्रकल्पांच्या मुद्द्यावरून महायुतीमधील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. कर्जत-खालापूर परिसरातील प्रस्तावित टोरंट प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या शिंदे गटात राजकीय संघर्षाला सुरुवात झाली आहे. या वादात दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असून, आता आमदार अनिकेत तटकरे यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. सविस्तर वाचा…
Source link
राष्ट्रवादीत नाराजीच्या चर्चा फेटाळल्या:सुनेत्रा पवारांसोबत मुंबईत कोअर कमिटीची बैठक, तटकरेंनी सांगितलं आज काय घडलं?