राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष कार्य अधिकारी (OSD) असल्याचा बनाव रचून एका नामांकित कंत्राटदाराला तब्बल ३.२५ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्याला मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील 40 वर्
.
50 कोटींच्या बिलांचे आमिष अन् कमिशनच्या नावाखाली 3.25 कोटींची लूट
अकोला येथील नामांकित ‘ओबेरॉय कन्स्ट्रक्शन’चे कंत्राटदार रणजीतसिंग ओबेरॉय यांची सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) सुमारे ५० कोटी रुपयांची बिले दीर्घकाळापासून प्रलंबित होती. आरोपी आसिफ पठाण याने कंत्राटदार ओबेरॉय यांच्याशी संपर्क साधून आपण मंत्रालयात वरिष्ठ पदावर असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी (विशेष कार्य अधिकारी) असल्याचे भासवले. आपल्या शब्दाबाहेर मंत्रालयातील एकही फाईल जात नाही, असा विश्वास त्याने निर्माण केला. 50 कोटी रुपयांची थकबाकी तातडीने मंजूर करून देतो, असा दावा करत आरोपीने कमिशनच्या नावाखाली ओबेरॉय यांच्याकडून वेळोवेळी तब्बल 3.25 कोटी रुपये उकळले.
10 सप्टेंबरला मुंबईत 1.25 कोटींची डिलिव्हरी; तरीही आणखी 75 लाखांची हाव
गुन्ह्याचा कट रचताना आरोपीने अत्यंत पद्धतशीरपणे कंत्राटदाराला जाळ्यात ओढले. ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे आरोपीने ओबेरॉय यांना 10 सप्टेंबर रोजी मुंबईत बोलावून घेतले. मंत्रालयाच्या परिसराचा आणि जवळच्या ठिकाणांचा संदर्भ देऊन आरोपीने आपल्या एका साथीदारामार्फत 1.25 कोटी रुपयांची रोकड प्रत्यक्ष स्वीकारली. कंत्राटदाराकडून 3.25 कोटी रुपये उकळल्यानंतरही आरोपीची हाव संपली नाही. बिले पास करण्यासाठी आणखी 75 लाख रुपयांची तातडीची गरज असल्याचे सांगून त्याने ओबेरॉय यांच्याकडे पैशांचा तगादा लावला.
30 सप्टेंबरला मंत्रालयात चौकशी अन् तोतया अधिकाऱ्याचे बिंग फुटले!
सततच्या पैशांच्या मागणीमुळे कंत्राटदार रणजीतसिंग ओबेरॉय यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. 30 सप्टेंबर रोजी ओबेरॉय यांनी थेट मुंबईतील मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री कार्यालय (CMO) आणि संबंधित विभागात आसिफ इस्माईल पठाण नावाच्या अधिकाऱ्याची कसून चौकशी केली. तेव्हा या नावाचा कोणताही व्यक्ती मुख्यमंत्री कार्यालयात किंवा शासनाच्या कोणत्याही खात्यात वरिष्ठ अधिकारी अथवा ओएसडी म्हणून कार्यरत नसल्याचे उघड झाले.
मरीन ड्राइव्ह पोलिसांत तक्रार
स्वतःची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ओबेरॉय यांनी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि सापळा रचून छत्रपती संभाजीनगर येथून आसिफ पठाणला जेरबंद केले.
6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
मरीन ड्राइव्ह पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने उकळलेली 3.25 कोटी रुपयांची रोकड नेमकी कुठे लपवली आहे, गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि मुंबईत पैसे स्वीकारणारा कथित साथीदार कोण, याचा शोध पोलीस घेत आहेत. मंत्रालयातील बड्या नेत्यांचे आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे नाव वापरून आरोपीने यापूर्वीही राज्यातील इतर बांधकाम कंत्राटदारांना अशाच प्रकारे चुना लावला असावा, असा पोलिसांना दाट संशय असून त्या अनुषंगाने सखोल तपास सुरू आहे.
————————————————————-
हेही वाचा..
माझ्याकडे चार नाही, अनेक ऑडिओ क्लिप्स: वेळ आल्यावर आणखी बॉम्ब फोडणार, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला थेट इशारा

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता राज्य सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांना थेट आणि इशारा दिला आहे. “माझ्याकडे फक्त चार ऑडिओ क्लिप्स नाहीत, तर अशा अनेक क्लिप्स आहेत. जर सरकारने आमच्याविरोधात सुरू असलेले हे षडयंत्र थांबवले नाही, तर मी लवकरच आणखी काही ऑडिओ बॉम्ब फोडणार आहे,” असा खळबळजनक इशारा जरांगे यांनी दिला आहे. सविस्तर वाचा