![]()
मुंबई महानगर प्रदेशातील भाईंदर पश्चिमेच्या उत्तन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तनमधील सरकारी जागेवर बेकायदा कब्जा करून हातभट्टीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. या ठिकाणी आरोग्यास घातक असलेली दारू तयार केली जात होती. त्यासाठी गॅस सिलिंडरच्या साहाय्याने पाणी गरम केले जात असताना अचानक सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर भाजले. मात्र, या दुर्घटनेनंतर पोलिसांच्या कारवाईची भीती आणि बेकायदा व्यवसाय उघड होण्याच्या धास्तीने आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तन परिसरातील एका खोलीत सॅबस्टीन मेंडोसा, त्याचा भाऊ संदीप मेंडोसा आणि रितू चौधरी (वय 32) हे तिघे उपस्थित होते. बेकायदा हातभट्टीसाठी लागणारी प्रक्रिया सुरू असताना पाणी गरम केले जात होते. त्याचवेळी अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की सिलिंडर आणि गरम पाण्याची टोप उडाली. या दुर्घटनेत रितू चौधरी यांचा आगीत आणि गरम पाण्यामुळे होरपळून जागीच मृत्यू झाला. तर सॅबस्टीन आणि संदीप मेंडोसा हे दोघेही गरम पाण्यामुळे भाजून जखमी झाले. मृत्यूची माहिती लपवण्यासाठी मृतदेह जाळल्याचा आरोप या दुर्घटनेनंतर आरोपींनी पोलिसांना घटनेची खरी माहिती देण्याऐवजी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे. हातभट्टीचा बेकायदा व्यवसाय पोलिसांच्या निदर्शनास आल्यास कारवाई होऊ शकते, या भीतीने मृत्यूची घटना लपवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. त्यासाठी मृतदेह जाळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे, तर घटनास्थळावरील खोलीवर डिझेल ओतून तिला आग लावण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेली आग आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी लावण्यात आलेली आग, या दोन्ही बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. पत्नीनेही पोलिसांची दिशाभूल केल्याचा संशय या प्रकरणात पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मृत तरुणाच्या पत्नीनेही खोटी माहिती दिल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. सुरुवातीला ही घटना केवळ गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे घडलेली दुर्घटना असल्याचे चित्र होते. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर मृत्यूचे सत्य लपवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचाही शोध घेतला जात आहे. इगतपुरीतून मुख्य आरोपीला ताब्यात या प्रकरणातील आरोपी सॅबस्टीन मेंडोसा याचा पोलिसांनी शोध सुरू केला होता. तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. मात्र, मिरा-भाईंदर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा माग काढत इगतपुरी येथून त्याला ताब्यात घेतले. सॅबस्टीन मेंडोसा हा तडीपार सराईत गुन्हेगार असल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणात त्याचा भाऊ संदीप मेंडोसा आणि इतर संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे उत्तन परिसरात खळबळ उडाली आहे. सरकारी जागेवर बेकायदा कब्जा करून हातभट्टीचा व्यवसाय सुरू होता का, या व्यवसायामागे आणखी कोणाचे पाठबळ होते, स्फोटानंतर पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात नेमके कोण सहभागी होते, अशा विविध प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत. सध्या आरोपींची चौकशी सुरू असून या प्रकरणाचा सखोल तपास मिरा-भाईंदर गुन्हे शाखेकडून केला जात आहे. हेही वाचा…. कोल्हापुरातील रास्ता रोकोमुळे प्रवाशांची गैरसोय:राजू शेट्टींनी मागितली माफी, म्हणाले, आमचा नाईलाज झाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील किणी टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. गेल्या 36 तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल राजू शेट्टी यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा…
Source link
उत्तनमध्ये हातभट्टीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट:तरुणाचा होरपळून मृत्यू, पुरावा नष्ट करण्यासाठी संपूर्ण खोली पेटवली