Headlines

शिवन्यात 33 वर्षांनंतर भरली वर्गमित्रांची शाळा:जिल्हा परिषद प्रशालेत स्नेहमेळावा, 1993 बॅचच्या 90 माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती




दहावीची परीक्षा संपली अन् कुणी पुढील उच्च शिक्षणासाठी, तर कुणी उद्योग-व्यवसायानिमित्त गावाबाहेर पडले. काळाच्या ओघात बालपणापासून सोबत असलेले जीवाभावाचे मित्र विभक्त झाले. आयुष्यात कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्यांचा डोंगर पेलत असतानाही मनाच्या एका कोपऱ्यात जपलेल्या शाळेच्या आठवणी मात्र आजही प्रत्येकाच्या मनात तितक्याच ताज्या होत्या. ३३ वर्षांनंतर शिवना येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या १९९३ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या शाळेची वाट धरली आणि अवघी शाळा जुन्या आठवणींनी पुनश्च गजबजून गेली. १९९३ मध्ये दहावीची परीक्षा दिल्यानंतर काळाच्या ओघात दुरावलेल्या या वर्गमित्र-मैत्रिणींची ३३ वर्षांत क्वचितच भेट व्हायची. मात्र, या विशेष स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने हे मित्र-मैत्रिणी पुन्हा एकदा एकाच छताखाली एकत्र आले. विशेष म्हणजे, या सोहळ्यासाठी ८० ते ९० माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी आवर्जून उपस्थित राहिले होते. या आनंददायी भेटीदरम्यान अनेकांनी पुन्हा एकदा दहावीच्या त्याच वर्गात जाऊन बसण्याचा मनमुराद अनुभव घेतला. यावेळी अनेकांनी मनोगतातून भावना मांडल्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी गटशिक्षणाधिकारी फाळके, गोसावी, धनवई आणि शेख यांची उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक बाविस्कर होते. प्रदीर्घ काळानंतर एकत्र भेटलेल्या मित्रांच्या चेहऱ्यावर बालपण जगल्याचा आनंद ओसंडून वाहत होता, तर काहींच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. जुन्या आठवणींमुळे जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू सोहळ्याच्या सुरुवातीला याहिया पठाण यांनी प्रास्ताविकातून स्नेहमेळाव्यामागची भूमिका व मुख्य उद्देश स्पष्ट केला. यानंतर गणेश काळे यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार राजूबाबा काळे यांनी मानले. प्रदीर्घ काळानंतर झालेला अभूतपूर्व स्नेहमेळावा अतिशय उत्साहात व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शिवना येथील स्थानिक मित्रांनी विशेष परिश्रम घेतले. वर्गातील बाकांवर बसून बालपणीचा खोडकरपणा, शिक्षकांची कडक शिस्त, मनातील भीती, शिक्षकांच्या छडीचा मार आणि वर्गातील धमाल-मस्ती या सर्व जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *