![]()
दिवाळीचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता कष्टकरी व गरजू घटकांसोबत वाटून घेण्याचा संदेश देत पैठण येथील आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिरचा सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविला. शाळेच्या दत्तक ग्राम उपक्रमांतर्गत वडाळा गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना फराळाचे वाटप करण्यात आले. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. दुष्काळी आणि प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात आनंद फुलविण्याच्या उद्देशाने शिक्षकांनी शेतशिवारात प्रत्यक्ष पोहोचून फराळाचे वाटप केले. फराळ स्वीकारताना कामगारांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान या उपक्रमाचे सार्थक करणारे ठरले. संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा आर्य चाणक्य विद्यामंदिरचे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी आणि विजय चाटुपळे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. यावेळी विलास खर्डेकर, अर्चना गिरवलकर, प्रमोद काकडे, उज्वला कुटे आणि आशुतोष पानगे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. केवळ पुस्तकी शिक्षण न देता विद्यार्थ्यांमध्ये सहवेदना, माणुसकीची मूल्ये रुजविणारा हा उपक्रम कौतुकाचा विषय ठरला आहे. दिवाळीचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता गरजू आणि कष्टकरी बांधवांसोबत वाटून घेण्यातच आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही या उपक्रमातून केला असल्याचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य यांनी सांगितले.
Source link
बांधावर जाऊन ऊसतोड कामगारांना विद्यार्थ्यांनी केले फराळाचे वितरण:पैठण येथील आर्य चाणक्य विद्यामंदिरचा वडाळा येथील शेतामध्ये उपक्रम