![]()
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खेड पिंपरी येथे दिवाळीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते विलास बामनोटे यांच्या वतीने गावातील ११ गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. यंदा गावात कोरड्या दुष्काळामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अडचणीची झाली आहे. अशा परिस्थितीत दिवाळीच्या सणासाठी मिळालेल्या मदतीमुळे गरजू कुटुंबांना दिलासा मिळाला असून, त्यांनाही सण आनंदाने साजरा करता येणार आहे. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मंगेश कांबळे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. किराणा किटमध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळ, तेल, साखर, मसाले आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. बामनोटे हे स्वतःच्या खर्चातून दरवर्षी विविध गावांतील गरजू कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप करून मदतीचा हात देतात. यंदा सरपंच कांबळे यांनी गावातील गरजू कुटुंबांची आर्थिक परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी खेड पिंपरीतील कुटुंबांसाठी हा उपक्रम राबवला. या मदतीमुळे सणाच्या काळात किराण्याचा खर्च कमी होण्यास कुटुंबांना मदत झाली. समाजातील गरजू लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करणे, हाच या उपक्रमामागील उद्देश आहे. यावेळी सरपंच कांबळे यांनी बामनोटे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. दिवाळी हा आनंद वाटून साजरा करण्याचा सण असून, अशा उपक्रमांमुळे गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसते, असे त्यांनी सांगितले. तसेच या मदतीबद्दल त्यांनी विलास बामनोटे यांचे विशेष आभार मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Source link
खेड पिंपरीत गरजू कुटुंबांना दिवाळी किराणा किट वाटप:सामाजिक कार्यकर्ते बामनोटे यांचा पुढाकार; कुटुंबांना दिलासा