![]()
ऊसाला प्रति टन ४५०० रुपये पहिला हप्ता मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन आता निर्णायक वळणावर पोहोचले आहे. शेतकऱ्यांनी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरला असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत महामार्ग सुरू होऊ देणार नाही, असा ठाम इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. तसेच, आज जर तोडगा निघाला नाही, तर उद्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीनही जिल्ह्यांमध्ये ‘कडकडीत बंद’ पाळण्याची मोठी घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. ‘एक दिवस वाट बघू, उद्या कडकडीत बंद’ आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करताना राजू शेट्टी म्हणाले, “आज जर का निर्णय लागला नाही, तर उद्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंद पाळून आपण आपला निषेध नोंदवायचा आहे. हा कडकडीत बंद असेल, रस्त्यासकट सगळाच बंद. दूध आणि इतर सर्व गोष्टी बंद राहतील. आपण त्यांची आणखी एक दिवस वाट बघू, पण त्यानंतर कठोर पावले उचलावी लागतील.” दिवाळीच्या प्रवाशांची मागितली जाहीर माफी या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून, दिवाळीच्या सणासाठी आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांचा मोठा खोळंबा होत आहे. यावर खंत व्यक्त करताना राजू शेट्टी यांनी प्रवाशांची जाहीर माफी मागितली. ते म्हणाले, “कोल्हापूरला येणाऱ्या प्रवाशांची आणि वाहतूकदारांची जी गैरसोय झालेली आहे, त्यांना जो मनस्ताप आणि त्रास झालेला आहे, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांच्या वतीने त्यांची माफी मागतो. पण आम्ही काय करू? आम्ही हतबल झालेलो आहोत.” ‘महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या शेतकऱ्यांची एकजूट मोडण्याचा डाव’ शेतकऱ्यांच्या एकजुटीबाबत बोलताना शेट्टींनी सरकार आणि कारखानदारांवर गंभीर आरोप केला. “इतिहासामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या शेतकऱ्यांना आपण एक केले आहे. कधी नव्हे तो कर्नाटकातला शेतकरीही आपल्यासोबत एक झालेला आहे. पण आता त्यांची ही एकजूट, त्यांची ही एकी मोडून काढायचे काही लोकांनी ठरवले आहे, कारण दरवर्षी त्यांना आमच्या या एकजुटीचा त्रास होतो,” असे शेट्टी म्हणाले. दिवाळीच्या तोंडावर महामार्ग रोखल्या गेल्याने प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. आता सरकार आणि कारखानदार यावर आजच काही तोडगा काढतात, की उद्या तीन जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंद पाहायला मिळतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ————– हेही वाचा.. शरद पवार डिस्चार्जनंतर पुन्हा रुग्णालयात:मोदींच्या सल्ल्यानंतर पवार म्हणाले- आपण सोबत असाल तर देशाची चिंता नाही; आधी विलीनीकरणाच्याही होत्या चर्चा
पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर NCP (SP)चे प्रमुख शरद पवार यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी पवारांना सांगितले की, सुप्रिया आता तयार आहेत. सुप्रिया आणि आपण मिळून देश सांभाळू. आपण आराम करा. ही माहिती पवारांचे निकटवर्तीय विठ्ठल मनियार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. विठ्ठल यांच्या म्हणण्यानुसार, पवारांनी उत्तर दिले, “मी आराम करत आहे. तुम्ही सर्वजण सोबत असताना मला देशाची कोणतीही चिंता नाही.” सविस्तर वाचा
Source link