![]()
पुण्यात शेअर ट्रेडिंगमधून मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची ८ लाख ५७ हजार २७३ रुपयांची फसवणूक झाली. व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून त्यांना पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाईल क्रमांकधारक आणि बँक खातेधारकांविरोधात विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मारुती आत्माराम सरक (वय ३९, भिमनगर, विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, १७ मे २०२५ ते १९ जून २०२६ दरम्यान आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला. ‘जयराम ब्रोकिंग’च्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी केले आणि पैसे गुंतवण्यास सांगितले. विश्रांतवाडी पोलिस तपास करत आहेत. शेअर ट्रेडिंगमधून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दुसऱ्या व्यक्तीची ४ लाख ९८ हजार १८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली. व्हॉट्सअॅपवर संपर्क साधून ट्रेडिंग खाते उघडण्यासाठी लिंक पाठवण्यात आली होती. अज्ञात मोबाईल क्रमांकधारक आणि बँक खातेधारकांविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. समीर कमरुद्दीन तांबोळी (वय ५८, लोहियानगर, गंज पेठ, खडक) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २४ जून २०२५ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान हा प्रकार घडला. आरोपींनी व्हॉट्सअॅपवरून संपर्क करून शेअर ट्रेडिंग खाते तयार करण्यास सांगितले. लिंकवरून खाते उघडल्यानंतर त्यांची फसवणूक झाली. खडक पोलिस तपास करत आहेत. अशाचप्रकारे इंस्टाग्रामवरील रील पाहण्यासाठी अॅप डाउनलोड करण्यास सांगून वाघोलीतील एका व्यक्तीची ३ लाख ९० हजार ५०८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली. अॅपला मोबाईलचा प्रवेश मिळाल्यानंतर बँक खात्यातील रक्कम वळवली आणि क्रेडिट कार्डचा गैरवापर केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. अज्ञात मोबाईलधारक आणि अॅपधारकांविरोधात वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मजहरखान युसुफखान पठाण (वय ३५, मॅगमन आयरिस सोसायटी, राधास्वामी आश्रमाजवळ, केसनंद गाव, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ५ ते ६ जूनदरम्यान आरोपीने ‘पांडा टीव्ही’ अॅपवर मोफत रील पाहता येतील, असा संदेश पाठवला. अॅप डाउनलोड केल्यानंतर खात्यातून ९८ हजार ८ रुपये वळवले. तसेच अॅमेझॉन व्हाउचरद्वारे २ लाख ९२ हजार ५०० रुपयांची खरेदी केली. वाघोली पोलिस तपास करत आहेत.
Source link
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक:व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये गुंतवणुकीस प्रवृत्त करून 8 लाख 57 हजार 273 रुपये घेतले