Headlines

फटाक्यांच्या ठिणग्यांनी डोळ्यांना इजा होऊ शकते:नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभाते यांचे खबरदारीचे आवाहन




पुणे प्रतिनिधी. दिवाळीत फटाक्यांच्या ठिणग्या, उष्णता आणि उडणाऱ्या तुकड्यांमुळे डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. काही वेळा दृष्टी कायमची जाऊ शकते. त्यामुळे फटाके फोडताना काळजी घ्या आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या, असे आवाहन डॉ. दूधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटरचे वरिष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभाते यांनी केले आहे. फटाके पेटवणाऱ्यांसोबतच जवळ उभ्या असलेल्या लोकांनाही इजा होण्याचा धोका असतो. लहान मुलांना फटाक्यांपासून दूर ठेवा. फुलबाज्याही पूर्णपणे सुरक्षित नसतात. त्यातून उडणाऱ्या ठिणग्या आणि उष्णतेमुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. फटाके फोडताना सुरक्षित अंतर ठेवा आणि शक्य असल्यास संरक्षणात्मक चष्मा वापरा. लहान मुलांना फटाके हाताळू देऊ नका. न पेटलेले किंवा अर्धवट जळालेले फटाके पुन्हा पेटवू नका. फटाक्यांवर वाकून पाहणे किंवा हातात धरून पेटवणे टाळा. गर्दीच्या ठिकाणी किंवा इतरांच्या दिशेने फटाके उडवू नका, अशी सूचनाही डॉ. दूधभाते यांनी केली. फटाक्याची ठिणगी किंवा तुकडा डोळ्यात गेल्यास डोळा चोळू नका किंवा त्यावर दाब देऊ नका. डोळ्यात रुतलेला तुकडा स्वतः काढण्याचा प्रयत्न करू नका. डोळ्याला भेदक जखम झाली असण्याची शक्यता असल्यास पाण्याने धुऊ नका आणि तातडीने नेत्ररोगतज्ज्ञांकडे जा. डोळ्यात रसायन पडल्यास लगेच भरपूर स्वच्छ पाण्याने धुवा आणि वैद्यकीय मदत घ्या. डोळा दुखणे, लाल होणे, सतत पाणी येणे किंवा दृष्टी धूसर होणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी करा. “दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. क्षणिक आनंदासाठी आयुष्यभराची दृष्टी धोक्यात घालू नका. स्वतःच्या आणि इतरांच्या डोळ्यांची काळजी घेऊन सुरक्षित दिवाळी साजरी करा,” असे आवाहन डॉ. अनिल दूधभाते यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *