![]()
समाजातील गरजू, वंचित आणि दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण करणे, त्यांच्या जीवनात आनंद आणि विश्वास निर्माण करणे, हीच खरी दिवाळी आहे. शरीराच्या काही मर्यादा असल्या तरी दिव्यांग बांधवांमध्ये प्रचंड जिद्द आणि चिकाटी आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी दिव्यांग बांधवांसोबत आयोजित दिवाळी स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. यावेळी दिव्यांग बांधवांसोबत फराळ करत, त्यांना भेटवस्तू देऊन शिंदे यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामुळे ‘नंदनवन’ निवासस्थानाला खऱ्या अर्थाने ‘आनंदवन’चे स्वरूप प्राप्त झाले. दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह आणि समाधान यामुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक महत्त्व प्राप्त झाले. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘नंदनवन’ हे केवळ शासकीय निवासस्थान नसून सर्वसामान्य नागरिक, गरजू आणि दिव्यांग बांधवांसाठी हक्काचे ठिकाण आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगता यावे, त्यांना आवश्यक सुविधा आणि मदत मिळावी, यासाठी शासन आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याचा हा प्रयत्न आहे. आज या सर्वांसोबत दिवाळी साजरी करताना माझी खऱ्या अर्थाने दिवाळी झाली, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना राज्य सरकारने दिव्यांग बांधवांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या कल्याणासाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केली आहे. या निर्णयामुळे दिव्यांगांच्या प्रश्नांना स्वतंत्र व्यासपीठ मिळाले असून, त्यांच्या रोजगारासह विविध कल्याणकारी योजनांना चालना मिळाली आहे. अनेक दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून ते स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत. दिव्यांगांना केवळ मदत देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांना स्वावलंबी बनविणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दिव्यांगांच्या कल्याणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या एकूण निधीपैकी एक टक्का निधी थेट त्यांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून दिव्यांगांना आवश्यक सुविधा, साधने आणि विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. दिव्यांगांना त्यांच्या गरजेनुसार मदत मिळावी आणि त्यांना दैनंदिन जीवन जगताना येणाऱ्या अडचणी कमी व्हाव्यात, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दीड हजारांहून अधिक दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात आतापर्यंत दीड हजारांहून अधिक दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात, पाय (जयपूर फूट), वॉकर, श्रवणयंत्र तसेच इतर आवश्यक उपकरणांचे वाटप करण्यात आले आहे. या उपकरणांमुळे अनेक दिव्यांगांना दैनंदिन कामे करणे सोपे झाले असून, त्यांच्या जीवनात आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची नवी उमेद निर्माण झाली आहे. हा उपक्रम केवळ ठाणे शहरापुरता मर्यादित न ठेवता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्येही राबविण्यात येणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या शारीरिक मर्यादांमुळे शिक्षण, रोजगार आणि दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांना आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देणे, त्यांना आर्थिक आणि सामाजिक आधार देणे महत्त्वाचे आहे. शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. हृदयविकाराच्या बालकांसोबतही साजरी केली दिवाळी जन्मजात हृदयविकार असलेल्या बालकांच्या महागड्या शस्त्रक्रिया तसेच कॉक्लिअर इम्प्लांटच्या माध्यमातून ऐकू आणि बोलू लागलेल्या मुलांच्या कुटुंबीयांसोबतही अलीकडेच दिवाळी साजरी करण्यात आली. या उपचारांमुळे मुलांच्या आयुष्यात झालेला सकारात्मक बदल आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून वेगळेच समाधान मिळते. एखाद्या कुटुंबाला संकटातून बाहेर काढता आले, एखाद्या मुलाला नव्याने ऐकण्याची आणि बोलण्याची संधी मिळाली, तर त्यापेक्षा मोठे समाधान दुसरे नाही, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांसोबत जालन्यात दिवाळी साजरी करणार यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या जालन्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी धीर सोडू नये आणि कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. मात्र, केवळ सरकारनेच नव्हे तर समाजातील हजारो हातांनीही संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी पुढे आले पाहिजे. सध्या राजकारण करण्याची वेळ नसून, अडचणीत सापडलेल्या शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी माणुसकीच्या भावनेतून उभे राहण्याची वेळ आहे. समाजातील प्रत्येकाने शक्य होईल त्या पद्धतीने गरजूंची मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांसोबत दिवाळीचा फराळ केला. त्यांना भेटवस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या स्नेहमेळाव्यामुळे दिव्यांग बांधवांना सणाच्या आनंदासोबत आपुलकी आणि सन्मानाची अनुभूती मिळाली. हेही वाचा…. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर उदय सामंतांची सावध भूमिका:सुनील तटकरेंच्या विधानातील विसंगतीवर उपस्थित केले प्रश्न राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना नव्याने सुरुवात झाली. त्यातच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत वेगवेगळी विधाने समोर येत असल्याने राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनील तटकरे यांच्या आधीच्या आणि आताच्या विधानांमध्ये तफावत असल्याचे सांगत सामंत यांनी या विषयावर सावध भूमिका घेतली आहे. सविस्तर वाचा….
Source link
दिव्यांगांसोबत दिवाळी साजरी करताना एकनाथ शिंदे भावुक:‘नंदनवन’ बनले आनंदवन