Headlines

‘आधी आपल्या ताटातलं निस्तरा, मग दुसऱ्यांच्या ताटात डोकवा’:विलीनीकरणाच्या चर्चेवर उमेश पाटलांचा संजय शिरसाटांना टोला




राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे विधान शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘संजय शिरसाट यांना आमच्या पक्षाच्या संदर्भात भाष्य करण्याचा अधिकार दिला कोणी? आम्ही कधी तुमच्या पक्षाच्या संदर्भाने प्रतिक्रिया देतो का? मग तुम्हाला आमच्या विलीनीकरणाची चिंता कशाला?’ असा सवाल उमेश पाटील यांनी उपस्थित केला. तसेच, ‘तुमच्याकडेही आता दोन शिवसेना झाल्या आहेत. मग तुम्ही विलीनीकरणाचा पर्याय का स्वीकारत नाही?’ असा सवाल करत त्यांनी शिरसाट यांना प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा विषय गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेतल्यानंतर या चर्चांना पुन्हा वेग आला. त्यातच शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी विलीनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे विधान केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले. यावर प्रतिक्रिया देताना उमेश पाटील यांनी शिरसाट यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. उमेश पाटील म्हणाले की, संजय शिरसाट यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत विषयावर भाष्य करण्याचा अधिकार कोणी दिला, हे आधी त्यांनी स्पष्ट करावे. आम्ही कधी त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत घडामोडींवर भाष्य करतो का किंवा त्यांच्या पक्षाच्या संदर्भाने प्रतिक्रिया देतो का? मग त्यांनी आमच्या पक्षाच्या विलीनीकरणाची चिंता करण्याचे कारण काय? हा पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत विषय असून त्यावर पक्षातील नेते निर्णय घेतील. दुसऱ्या पक्षातील नेत्यांनी यावर भाष्य करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘तुमच्याकडेही दोन शिवसेना; विलीनीकरण का करत नाही?’ शिरसाट यांना प्रत्युत्तर देताना उमेश पाटील यांनी शिवसेनेतील फुटीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, तुमच्याकडेही आता दोन शिवसेना झाल्या आहेत. मग तुम्हीही विलीनीकरणाचा पर्याय का स्वीकारत नाही? तुमच्या पक्षाचे विलीनीकरण करण्याचे ठरले, तर उद्धव ठाकरे पक्षाचे अध्यक्ष राहणार की एकनाथ शिंदे अध्यक्ष राहणार, असा सवाल त्यांनी केला. केवळ पक्षाध्यक्षपदाचाच नव्हे, तर संघटनात्मक पातळीवरही अनेक प्रश्न निर्माण होतील, असे पाटील यांनी सांगितले. दोन्ही शिवसेनांचे विलीनीकरण झाल्यास वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या दोन-दोन जिल्हाध्यक्षांपैकी कोणाला पदावर ठेवणार आणि कोणाला पदावरून दूर करणार? तालुका स्तरावरील पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष आणि संघटनेतील इतर पदांबाबत काय निर्णय घेणार? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना प्राधान्य देणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना संधी देणार? असे अनेक प्रश्न निर्माण होतील, असे त्यांनी नमूद केले. ‘राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा करण्याची गरज नाही’ राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत बाहेरून चर्चा करण्यापेक्षा संबंधित पक्षातील नेत्यांनाच यावर निर्णय घेऊ द्यावा, असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, तुमच्या पक्षाच्या विलीनीकरणाबाबत टीव्हीवर किंवा माध्यमांमध्ये चर्चा होत नाही म्हणून तुम्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर अशा पद्धतीने चर्चा करणे योग्य नाही. हा आमच्या पक्षाच्या संदर्भातील विषय आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांनी आपल्या पक्षातील घडामोडींवर लक्ष केंद्रित करावे. दुसऱ्या पक्षाच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. शरद पवारांच्या प्रकृतीवर राजकारण न करण्याचे आवाहन दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीचाही उमेश पाटील यांनी उल्लेख केला. ते म्हणाले की, शरद पवार नुकतेच ब्रीच कँडी रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतले आहेत. त्यांना घशाचा संसर्ग झाला होता. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या पाहिजेत. अशा परिस्थितीत सातत्याने राजकीय विधाने करणे आणि राजकीय चर्चा सुरू ठेवणे योग्य नाही. शरद पवार यांच्या प्रकृतीला प्राधान्य देण्याची गरज असताना विलीनीकरणासारख्या राजकीय विषयांवर वारंवार भाष्य करणे टाळले पाहिजे, असेही पाटील यांनी सूचित केले. अखेरीस संजय शिरसाट यांना टोला लगावताना ते म्हणाले, ‘संजय शिरसाट यांनी त्यांच्या पक्षात काय चालले आहे, ते आधी पाहावे. आपल्या ताटातलं आधी निस्तरावं, मग दुसऱ्यांच्या ताटात डोकवावं.’ त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरून महायुतीतील नेत्यांमध्ये पुन्हा एकदा राजकीय शाब्दिक संघर्ष पाहायला मिळत आहे. हेही वाचा…. शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुख्यमंत्र्यांचा मुक्काम:सकाळी तर्री पोह्यांचा नाश्ता, अभ्यंगस्नान अन् अरुणाताईंनी केली भाऊबीज दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार आणि आत्मविश्वास देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाची दिवाळी शेतकरी कुटुंबासोबत साजरी केली. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे त्यांनी शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम केला. सायंकाळी कुटुंबासोबत भोजन, रात्री गप्पा आणि सकाळी घरगुती तर्री पोह्यांचा नाश्ता, असा हा दिवाळीचा आनंददायी अनुभव मुख्यमंत्र्यांनी घेतला. विशेष म्हणजे, सकाळी अरुणाताईंनी त्यांचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली. यावेळी ‘पुढच्या वर्षी वहिनींनाही सोबत घेऊन या’, असा आपुलकीचा आग्रह त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धरला. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *