Headlines

UPSCची तयारी, KBCमध्ये सहभाग:व्यवसायात तोटा झाल्यानंतर पदवीधर तरुण बनला चोर, दिल्लीतून अटक




अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेची तयारी करणारा, प्रसिद्ध टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी होणारा आणि स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करणारा एक उच्चशिक्षित तरुण अखेर चोरीच्या गुन्ह्यात अडकला आहे. ट्रॅव्हल व्यवसायात झालेला आर्थिक तोटा आणि डोक्यावर वाढलेले कर्ज यामुळे या तरुणाने चोरीचा मार्ग निवडल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. कांदिवली पश्चिम येथील एका नामांकित ज्वेलर्सच्या दुकानातून सुमारे 5 लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरून पसार झालेल्या या आरोपीला कांदिवली पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. सतीश कुमार कृष्णप्रसाद केसरी (वय 42) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा बिहारचा असून सध्या दिल्लीतील उत्तम नगर परिसरात राहत होता. विशेष म्हणजे, सतीश हा कॉम्प्युटर सायन्स विषयातील बीटेक पदवीधर आहे. उच्च शिक्षण घेऊनही आर्थिक अडचणींमुळे त्याने गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारल्याने या प्रकरणाची चर्चा होत आहे. अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले, KBCमध्येही नशीब आजमावले सतीश हा नोकरीच्या शोधात दिल्ली येथे आला होता. त्याला प्रशासकीय अधिकारी होण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने नोकरी सांभाळून यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. मात्र, अनेक प्रयत्न करूनही त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर त्याने मनोरंजन क्षेत्रात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. लोकप्रिय टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’मध्येही त्याने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात तो ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ या फेरीपर्यंत पोहोचला. मात्र, त्याला हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली नाही. स्पर्धा परीक्षा आणि टीव्ही शोमध्ये यश न मिळाल्यानंतर त्याने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पत्नीच्या मदतीने त्याने टुर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला. यासाठी त्याने कर्ज काढून चार ते पाच चारचाकी वाहने खरेदी केली. ही वाहने ओला आणि उबरसारख्या कंपन्यांशी जोडून व्यवसाय वाढवण्याचा त्याचा प्रयत्न होता. सुरुवातीला व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, व्यवसायात अपेक्षित फायदा झाला नाही. उलट वाहनांचे हप्ते आणि इतर खर्चामुळे आर्थिक अडचणी वाढत गेल्या. परिणामी, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले. कर्जाचा डोंगर वाढला, ज्वेलर्सना बनवले लक्ष्य आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सतीशने चोरी करण्याचा मार्ग स्वीकारल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्याने चोरीसाठी एक विशिष्ट पद्धत अवलंबली होती. ग्राहक असल्याचे भासवून नामांकित ज्वेलर्सच्या दुकानात जायचे. त्यानंतर दागिने पाहण्याची इच्छा व्यक्त करून दुकानातील कर्मचाऱ्यांकडून दागिने हातात घ्यायचे. कर्मचारी दुसऱ्या कामात व्यस्त असल्याची संधी साधून दागिने घेऊन दुकानातून पसार व्हायचे, अशी त्याची कार्यपद्धती होती. याच पद्धतीने त्याने मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरातील मथुरादास रोडवरील पद्मावती ज्वेलर्सला लक्ष्य केले. 15 नोव्हेंबर रोजी तो ग्राहक बनून या दुकानात गेला. दुकानातील कर्मचाऱ्यांकडे त्याने सोन्याची साखळी पाहण्याची मागणी केली. कर्मचाऱ्यांनी त्याला 43.2 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी दाखवली. या साखळीची किंमत सुमारे 5 लाख रुपये होती. दागिने पाहण्याच्या बहाण्याने हातात घेतल्यानंतर संधी साधून त्याने साखळी घेऊन दुकानातून पळ काढला. बनावट कागदपत्रांचा वापर, मोबाइलही केला बंद चोरी केल्यानंतर पोलिसांच्या तपासातून बचाव करण्यासाठी सतीशने खबरदारी घेतली होती. मुंबईत एका हॉस्टेलमध्ये राहताना त्याने बनावट कागदपत्रे सादर केली होती. चोरीच्या घटनेनंतर त्याने मोबाइल फोन बंद केला आणि मुंबईतून थेट दिल्ली गाठली. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांसमोर आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झाले होते. दरम्यान, कांदिवली पोलिसांनी या चोरीचा तपास सुरू केला. परिसरातील दुकानांचे आणि रस्त्यांवरील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यासोबतच तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी दिल्लीतील उत्तम नगर परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून आरोपीचा शोध कांदिवली पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले. तेथे शोधमोहीम राबवून पोलिसांनी सतीश कुमार केसरी याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान कांदिवलीतील पद्मावती ज्वेलर्समधील चोरीप्रकरणी त्याचा सहभाग उघड झाला. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेली सोन्याची साखळीही जप्त केली आहे. केवळ कांदिवलीतील चोरीच नव्हे, तर दिंडोशी परिसरातही अशाच प्रकारे चोरी केल्याची कबुली आरोपीने पोलिस चौकशीत दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याने यापूर्वी आणखी किती ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. सध्या आरोपी पोलिस कोठडीत असून कांदिवली पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. हेही वाचा… ‘आधी आपल्या ताटातलं निस्तरा, मग दुसऱ्यांच्या ताटात डोकवा’:विलीनीकरणाच्या चर्चेवर उमेश पाटलांचा संजय शिरसाटांना टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे विधान शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘संजय शिरसाट यांना आमच्या पक्षाच्या संदर्भात भाष्य करण्याचा अधिकार दिला कोणी? आम्ही कधी तुमच्या पक्षाच्या संदर्भाने प्रतिक्रिया देतो का? मग तुम्हाला आमच्या विलीनीकरणाची चिंता कशाला?’ असा सवाल उमेश पाटील यांनी उपस्थित केला. तसेच, ‘तुमच्याकडेही आता दोन शिवसेना झाल्या आहेत. मग तुम्ही विलीनीकरणाचा पर्याय का स्वीकारत नाही?’ असा सवाल करत त्यांनी शिरसाट यांना प्रत्युत्तर दिले. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *