![]()
ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या साक्षीने पुणे शहराने जागतिक विक्रमाला गवसणी घातली. ‘वन्दे मातरम्’च्या सार्धशताब्दी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित दीपप्रज्वलन सोहळ्यात तब्बल 38 हजार 233 पणत्या एकाच वेळी प्रज्वलित करण्यात आल्या. या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद झाली. देशभक्ती, राष्ट्राभिमान आणि भारतीय सैन्यदलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या सोहळ्याने शनिवारवाड्याचा परिसर दीपप्रकाशाने उजळून निघाला. ‘सन्मान राष्ट्रगीताचा, अभिमान पुणेकरांचा’ या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर मंजुषा नागपुरे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि ब्रिगेडियर तरुणेश यांच्या हस्ते झाले. अभिनव विद्यालयाच्या 11 विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘वन्दे मातरम्’च्या गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. लष्करी बँडच्या देशभक्तिपर सुरांनी वातावरणात उत्साह निर्माण केला. या सोहळ्यात देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या जवानांच्या 50 वीरमाता आणि वीरपत्नींचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी वरिष्ठ लष्करी अधिकारी ब्रिगेडियर तरुणेश, कर्नल विकास सावळजे आणि कर्नल श्रीनिवास सातवळेकर यांचाही सन्मान करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री माधुरी मिसाळ आणि ब्रिगेडियर तरुणेश यांनी उपस्थितांना संबोधित केले. ‘वन्दे मातरम्’चा इतिहास, राष्ट्रभक्ती आणि सैन्यदलाचे देशाच्या सुरक्षेतील योगदान यावर त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमातील 38 हजार 233 पणत्यांचे एकाच वेळी करण्यात आलेले प्रज्वलन हे मुख्य आकर्षण ठरले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकृत परीक्षक स्वप्नील डांगरीकर यांनी या उपक्रमाची प्रत्यक्ष पडताळणी केली. त्यानंतर विक्रमाची अधिकृत नोंद झाल्याचे जाहीर करण्यात आले. महापौर मंजुषा नागपुरे आणि आयुक्त नवल किशोर राम यांनी विक्रमाचे प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर, ओमप्रकाश दिवटे, महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते. उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनाने सोहळ्याची सांगता झाली. ऐतिहासिक शनिवारवाड्यातील या उपक्रमामुळे पुण्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवात जागतिक विक्रमाची भर पडली.
Source link