Headlines

शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुख्यमंत्र्यांचा मुक्काम:सकाळी तर्री पोह्यांचा नाश्ता, अभ्यंगस्नान अन् अरुणाताईंनी केली भाऊबीज, पुढील वर्षी वहिनींनाही सोबत आणण्याचा आग्रह




दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार आणि आत्मविश्वास देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाची दिवाळी शेतकरी कुटुंबासोबत साजरी केली. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे त्यांनी शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम केला. सायंकाळी कुटुंबासोबत भोजन, रात्री गप्पा आणि सकाळी घरगुती तर्री पोह्यांचा नाश्ता, असा हा दिवाळीचा आनंददायी अनुभव मुख्यमंत्र्यांनी घेतला. विशेष म्हणजे, सकाळी अरुणाताईंनी त्यांचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली. यावेळी ‘पुढच्या वर्षी वहिनींनाही सोबत घेऊन या’, असा आपुलकीचा आग्रह त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल लोहारी सावंगा गावाला भेट देत शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. घरातील सदस्यांप्रमाणे बालपांडे कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. सायंकाळी कुटुंबीयांसोबत भोजन केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर घरातील सदस्यांसोबत गप्पा मारत त्यांनी रात्रीचा वेळ घालवला. सकाळी उठल्यानंतर घरातील महिलांनी बनवलेला तर्री पोहा हा खास नाश्ता मुख्यमंत्र्यांनी घेतला. पोहा आपल्याला आवडतो आणि आठवड्यातून किमान चार दिवस नाश्त्याला पोहे असतात, असे त्यांनी यावेळी कुटुंबीयांशी बोलताना सांगितले. बालपांडे कुटुंबीयांनी केलेल्या पाहुणचाराबद्दल समाधान व्यक्त करताना, ‘तुमच्यासोबत दिवस आनंदात गेला. छान झोप लागली,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. शेकोटीचा आनंद घेण्याचीही मुख्यमंत्र्यांची इच्छा रात्री परिसरात थंडी असल्याने बालपांडे कुटुंबीयांनी घराबाहेर शेकोटी पेटवली होती. मात्र, याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली नव्हती. सकाळी याबाबत बोलताना त्यांनी, ‘तुम्ही मला सांगितले नाही. मीसुद्धा खूप दिवसांनंतर शेकोटीचा आनंद घेतला असता,’ असे मिश्किलपणे सांगितले. यामुळे कुटुंबीयांसोबतच्या त्यांच्या गप्पांमध्ये आणखी आपुलकी निर्माण झाली. यावेळी अरुणाताईंनी मुख्यमंत्र्यांना पुढील वर्षी पत्नीला सोबत घेऊन येण्याची विनंती केली. ‘दादा, आपण आमच्याकडे आवर्जून आलात, आम्हाला खूप आनंद झाला. पुढच्या वर्षी वहिनींना सोबत घेऊन या,’ असे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या या आग्रहाला सकारात्मक प्रतिसाद दिला. मुंबईत राहणाऱ्या रामेश्वरी सावरकर या कुटुंबातील नातेवाईक महिलेशी त्यांनी मोबाईलवरून संवाद साधला. मुंबईत काही अडचण असल्यास नक्की भेटा, असे आश्वासनही त्यांनी दिले. नारायणीची पहिली दिवाळी मुख्यमंत्र्यांसोबत रामभाऊ बालपांडे आणि त्यांच्या पत्नी अरुणाताईंनी मुख्यमंत्र्यांचे घरातील सदस्याप्रमाणे आदरातिथ्य केले. कुटुंबातील मुले प्रवीण आणि अजय, तसेच सुना राणी आणि स्वाती यांनी स्वतःच्या हाताने जेवण तयार करून मुख्यमंत्र्यांना वाढले. या कुटुंबातील अवघ्या सात महिन्यांच्या नारायणीची ही पहिलीच दिवाळी होती. विशेष म्हणजे, तिची पहिली दिवाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साजरी झाली. या प्रसंगाबद्दल आनंद व्यक्त करताना नारायणीचे वडील प्रवीण यांनी, ‘ती मोठी झाल्यानंतर आम्ही तिला मुख्यमंत्र्यांसोबत दिवाळी साजरी केल्याचे फोटो दाखवू,’ असे सांगितले. त्यामुळे बालपांडे कुटुंबासाठी हा दिवाळीचा अनुभव कायमस्वरूपी आठवणीत राहणारा ठरला. अभ्यंगस्नान करून मुख्यमंत्र्यांची भाऊबीज दिवाळीच्या सकाळी मुख्यमंत्र्यांनी बालपांडे कुटुंबातच अभ्यंगस्नान केले. त्यानंतर अरुणाताईंनी त्यांचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली. घरातील इतर महिलांनीही पारंपरिक पद्धतीने ओवाळणी आणि औक्षण केले. मुख्यमंत्र्यांनीदेखील शेतकरी भगिनींच्या ताटात ओवाळणी घालत या सणाचा आनंद द्विगुणित केला. राजकीय आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांपलीकडे जाऊन एका शेतकरी कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांनी हा सण साजरा केला. ‘बालपांडे कुटुंबाशी जवळीक निर्माण झाली’ लोहारी सावंगा गावातून रवाना होताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकरी कुटुंबात मुक्काम केल्यानंतरचा अनुभव विचारला असता त्यांनी बालपांडे कुटुंबीयांशी जवळीक निर्माण झाल्याचे सांगितले. कुटुंबाने अतिशय छान आदरातिथ्य केले. रामभाऊ बालपांडे यांनाही दुष्काळाचा फटका बसला आहे. मात्र, त्यांनी परिस्थितीसमोर हार मानलेली नाही. त्यांच्या कुटुंबातील तीन खातेदारांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, याचे समाधान वाटते, असे मुख्यमंत्री म्हणाले. बालपांडे कुटुंबीय नियमितपणे वारीला जातात. विठ्ठलाची अर्चना करणारा परिवार कधीही हतबल होत नाही. अशा कुटुंबांमध्ये विपरीत परिस्थितीचा सामना करण्याचे बळ असते, असेही त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी अशा भेटी महत्त्वाच्या असल्याचे त्यांच्या संवादातून दिसून आले. 75 वर्षांच्या कमलाबाईंना मदतीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या या भेटीदरम्यान 75 वर्षीय कमलाबाई मानेराव यांनीही त्यांची भेट घेतली. वाढत्या वयामुळे कामधंदा करणे शक्य होत नसल्याने त्यांनी बकरीपालनासाठी प्रस्ताव मंजूर करण्याची तसेच अपंग मुलाला आर्थिक मदत मिळवून देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली. यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच कमलाबाईंना निराधार अनुदानाचा लाभ मिळू शकतो का, याचीही पडताळणी करण्यास सांगितले. एकीकडे शेतकऱ्यांच्या कुटुंबात दिवाळीचा आनंद साजरा करताना दुसरीकडे अडचणीत असलेल्या ज्येष्ठ महिलेला मदतीचा विश्वास देत मुख्यमंत्र्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधला. बालपांडे कुटुंबाचा पाहुणचार, तर्री पोह्यांचा नाश्ता, भाऊबीजेचे औक्षण आणि नारायणीची पहिली दिवाळी अशा अनेक आठवणी घेऊन मुख्यमंत्री लोहारी सावंगा येथून रवाना झाले. हेही वाचा…. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर उदय सामंतांची सावध भूमिका:सुनील तटकरेंच्या विधानातील विसंगतीवर उपस्थित केले प्रश्न राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना नव्याने सुरुवात झाली. त्यातच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत वेगवेगळी विधाने समोर येत असल्याने राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनील तटकरे यांच्या आधीच्या आणि आताच्या विधानांमध्ये तफावत असल्याचे सांगत सामंत यांनी या विषयावर सावध भूमिका घेतली आहे. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *