Headlines

शरद पवारांसोबतच्या भेटीचा तपशील प्रफुल पटेलांनी सांगितला:राजकीय चर्चांबाबत म्हणाले, काही विशेष बोलणं झालं नाही




शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना सुरुवात झाली. विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला. त्यातच शरद पवार आणि प्रफुल पटेल यांच्यात झालेल्या संवादाचा व्हिडिओ समोर आल्याने या भेटीबाबतची उत्सुकता आणखी वाढली होती. आता या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत प्रफुल पटेल यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीत कोणतीही विशेष राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवारांची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो प्रफुल पटेल यांनी शुक्रवारी, 6 नोव्हेंबर रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीमागे केवळ त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याचा उद्देश असल्याचे पटेल यांनी सांगितले. शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्षे काम करण्याची संधी मिळाली असून, त्यांचे आशीर्वाद नेहमीच लाभले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी आपण रुग्णालयात गेलो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. या भेटीबाबत बोलताना पटेल म्हणाले की, शरद पवार काही वैद्यकीय तपासण्यांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले असल्याने त्यांची तब्येत कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण भेटायला गेलो होतो. आमची भेट अतिशय चांगल्या वातावरणात झाली. आता ईश्वराच्या कृपेने त्यांची प्रकृती सुधारली असून ते घरी परतले आहेत. भेटीदरम्यान नेहमीप्रमाणे इकडच्या-तिकडच्या काही गोष्टींवर चर्चा झाली. मात्र, त्यामध्ये विशेष असे काही नव्हते, असे पटेल यांनी सांगितले. 10 तारखेनंतर भेटण्याचा विषय कसा निघाला? या भेटीदरम्यान शरद पवार यांनी 10 तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करू, असे प्रफुल पटेल यांना म्हटल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यामुळे 10 नोव्हेंबरनंतर दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांशी या भेटीचा संबंध जोडला जात होता. यावर स्पष्टीकरण देताना प्रफुल पटेल यांनी या संवादामागील पार्श्वभूमी सांगितली. ते म्हणाले की, दिवाळीच्या काळात आपण 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी गोंदियामध्ये असणार असल्याची माहिती शरद पवार यांनाही होती. त्यामुळे आपण 10 तारखेनंतर मुंबईत परत आल्यानंतर पुन्हा भेटू, असे त्यांना सांगितले होते. त्यावेळी शरद पवार रुग्णालयात असल्याने तिथे कोणत्याही विषयावर सविस्तर चर्चा करणे योग्य नव्हते. त्यामुळे रुग्णालयात चर्चा करण्याऐवजी ते घरी परतल्यानंतर भेटून बोलू, असे आपण म्हटल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले. ‘प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढू नका’ या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचेही प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्याविषयी आपल्याला पूर्वीपासून आदर असून तो कायम राहणार आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि त्यांनी राज्याला तसेच देशाला पुढेही मार्गदर्शन करत राहावे, अशी सर्वांचीच इच्छा असल्याचे पटेल म्हणाले. ते पुढे म्हणाले की, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसताना रुग्णालयात कोणती राजकीय चर्चा करणार? ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. त्यामुळे 10 तारखेनंतर भेटण्याबाबत झालेल्या संवादाचा अर्थ राजकीय चर्चेशी जोडणे योग्य नाही. आपण गोंदियाचा दौरा आटोपून मुंबईत परतल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, प्रफुल पटेल यांच्या या स्पष्टीकरणामुळे रुग्णालयातील भेटीबाबत सुरू असलेल्या चर्चांना काही प्रमाणात पूर्णविराम मिळाला असला, तरी 10 नोव्हेंबरनंतर दोन्ही नेत्यांची भेट होते का आणि त्या भेटीत काही राजकीय चर्चा होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार दरम्यान, दिवाळीनिमित्त गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा देताना प्रफुल पटेल यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य केले. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य नागरिक अडचणीत असल्याचे त्यांनी नमूद केले. या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगतानाच, पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींकडेही त्यांनी लक्ष वेधले. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील धान उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटातून जात आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आमची भूमिका आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांना मदत मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही प्रफुल पटेल यांनी दिली. हेही वाचा….
‘आधी आपल्या ताटातलं निस्तरा, मग दुसऱ्यांच्या ताटात डोकवा’:विलीनीकरणाच्या चर्चेवर उमेश पाटलांचा संजय शिरसाटांना टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे विधान शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘संजय शिरसाट यांना आमच्या पक्षाच्या संदर्भात भाष्य करण्याचा अधिकार दिला कोणी? आम्ही कधी तुमच्या पक्षाच्या संदर्भाने प्रतिक्रिया देतो का? मग तुम्हाला आमच्या विलीनीकरणाची चिंता कशाला?’ असा सवाल उमेश पाटील यांनी उपस्थित केला. तसेच, ‘तुमच्याकडेही आता दोन शिवसेना झाल्या आहेत. मग तुम्ही विलीनीकरणाचा पर्याय का स्वीकारत नाही?’ असा सवाल करत त्यांनी शिरसाट यांना प्रत्युत्तर दिले. सविस्तर वाचा…..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *