![]()
नाशिक येथील एका बँकेची दोन कोटींची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणात अटकेची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी कर्वेनगर भागातील एका ज्येष्ठ महिलेची ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला कर्वेनगर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. नाशिक येथील एका बँकेची दोन कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीतील रक्कम ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अटक (डिजिटल ॲरेस्ट) करण्यात येणार आहे, तसेच मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे, अशी भीती चोरट्यांनी त्यांना दाखविली. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी त्यांना धमकावले. त्यानंतर महिलेने चोरट्यांच्या बँक खात्यात गेल्या दोन ते तीन दिवसांत आरटीजीएस सुविधेचा वापर करुन ३२ लाख रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर महिलेकडे आणखी पैशांची मागणी करण्यात आली. महिलेने चौकशी केली. तेव्हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान तपास करत आहेत. सायबर छोटे मागील काही दिवसांपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करत आहे. त्यामुळे अशा प्रकारांना नागरिकांनी बळी न पडता पोलिसांकडे याबाबत तात्काळ तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Source link
अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेचे 32 लाख उकळले:नाशिकमधील बँकेच्या २ कोटींच्या फसवणुकीत अडकवण्याची धमकी; वारजे पोलिसांत गुन्हा दाखल