![]()
पुण्यात सायबर चोरट्यांनी तीन वेगवेगळ्या प्रकारांत तिघांची एकूण १७ लाख १४ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणांत भारती विद्यापीठ, बिबवेवाडी आणि स्वारगेट पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव बुद्रुक येथील एका सोसायटीत राहणाऱ्या व्यक्तीला चोरट्यांनी फोन केला. दिल्लीतील दूरसंचार विभागातून बोलत असल्याचे सांगून, त्यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर अमली पदार्थ तस्करीसाठी झाल्याचा दावा केला. या प्रकरणात अटक होईल, अशी भीती दाखवून चोरट्यांनी अटक टाळण्यासाठी पैसे भरण्यास सांगितले. तक्रारदाराने त्यांच्या खात्यात ५ लाख २० हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रंगराव पवार तपास करत आहेत. दुसऱ्या प्रकरणात, आभासी चलनात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यावसायिक तरुणाची ५ लाख १३ हजार रुपयांची फसवणूक झाली. चोरट्यांनी मोबाइलवर संपर्क साधून त्याला गुंतवणूक करण्यास सांगितले. त्याने पैसे जमा केल्यानंतर त्याला परतावा मिळाला नाही. तरुणाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिसऱ्या प्रकरणात, वाहतूक नियम मोडल्याचे बनावट चलन पाठवून एका व्यावसायिकाची ६ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक झाली. पुणे-सातारा रस्त्यावरील एका सोसायटीत राहणाऱ्या तक्रारदाराला दंड न भरल्यास कारवाई होईल, अशी भीती दाखवण्यात आली. चोरट्यांनी तक्रारदाराच्या बँक खात्याची माहिती घेतली आणि तिचा गैरवापर करून खात्यातून पैसे काढले. ही रक्कम दुसऱ्या खात्यात जमा करण्यात आली. व्यावसायिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास भारमळ तपास करत आहेत.
Source link
सायबर चोरट्यांनी तिघांकडून 17 लाखांहून अधिक रुपये उकळले:अमली पदार्थ प्रकरणात अटकेची भीती, आभासी चलनातील गुंतवणूक आणि बनावट चलनाचा वापर