![]()
गोकुळ दूध संघाच्या कारभारात हस्तक्षेप करायचा नसेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांना एकत्र बसण्याचा सल्ला देण्याऐवजी महायुतीच्या संचालकांना बैठकीला उपस्थित राहून कोरमपूर्ती करण्याचा सल्ला द्यावा. तीच खरी संविधानिक कर्तव्यपूर्ती ठरेल, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोकुळ दूध संघाच्या कारभारात राज्य सरकार हस्तक्षेप करू इच्छित नसल्याचे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना तिवारी यांनी, दूध उत्पादक सभासदांचा रोष पाहता सरकारला उशिरा सुचलेले हे शहाणपण असल्याची टीका केली. सरकारला खरोखरच हस्तक्षेप करायचा नसेल, तर निवडणुकीत सभासदांनी दिलेला कौल स्वीकारून महायुतीच्या संचालकांना कोरमपूर्तीसाठी उपस्थित राहण्यास सांगावे, असे त्यांनी म्हटले आहे. गोकुळ दूध संघाच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत माजी मंत्री आणि विधान परिषदेत काँग्रेसचे नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल बहुमताने विजयी झाले. महाविकास आघाडीच्या १३ संचालकांच्या मागे कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र उभा असल्याचा दावाही तिवारी यांनी केला. निवडणुकीत सभासदांनी निवडून दिलेल्या संचालक मंडळाचा कौल स्वीकारणे ही लोकशाहीची प्राथमिक जबाबदारी आहे. निवडणुकीत यश मिळाले नाही म्हणून सरकारी नियुक्त्यांच्या माध्यमातून संस्थेच्या कारभारात हस्तक्षेप करणे म्हणजे लोकशाही मूल्यांचा गळा घोटण्यासारखे आहे, अशी टीका त्यांनी केली. भाजपने गोकुळच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप करण्याऐवजी जागरूक विरोधी पक्षाची भूमिका बजावावी आणि संस्थेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही तिवारी यांनी केले. दरम्यान, सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील संविधानिक संचालक मंडळाच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Source link
गोकुळच्या कारभारात हस्तक्षेप न करण्याचे तिवारींचे आवाहन:फडणवीसांनी पाटील-मुश्रीफांना एकत्र बसण्याचा सल्ला न देता महायुतीच्या संचालकांना कोरमपूर्तीसाठी सांगावे