Headlines

मेट्रोच्या भंगारातून प्रतिकृती तयार:उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांना भेट; दोन किलो जीआय स्टील आणि प्लास्टिकच्या पिशवीचा वापर




पुणे मेट्रो मार्गिका तीनच्या बांधकामादरम्यान उरलेल्या टाकाऊ साहित्याचा कल्पक पुनर्वापर करून मेट्रोची सुबक लघुप्रतिकृती तयार करण्यात आली आहे. पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या (पीआयटीसीएमआरएल) वतीने मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे अनोखे स्मृतिचिन्ह नुकतेच भेट देण्यात आले. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी यांच्या हस्ते ही प्रतिकृती मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आली. विशेष म्हणजे, या प्रतिकृतीच्या निर्मितीसाठी सुमारे दोन किलो गॅल्व्हनाइज्ड आयर्न (जीआय) स्टीलचा वापर करण्यात आला आहे. मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामातून शिल्लक राहिलेल्या साहित्याला नव्या स्वरूपात आणण्यासाठी कंपनीने हा प्रयोग केला. प्रत्यक्ष मेट्रोची रचना, आकार आणि विविध बारकावे प्रतिकृतीत उतरवण्यासाठी वेल्डिंग, आकारनिर्मिती आणि अंतिम सजावटीची कामे काळजीपूर्वक करण्यात आली. या उपक्रमात केवळ प्रतिकृतीपुरताच पुनर्वापर मर्यादित ठेवण्यात आलेला नाही. तिच्या पॅकेजिंगसाठीही टाकाऊ प्लास्टिकचा वापर करण्यात आला. सुमारे ३० प्लास्टिक आवरणांवर विशेष प्रक्रिया करून त्यापासून पुनर्वापरयोग्य कापड तयार करण्यात आले. या कापडापासून तयार केलेल्या पिशवीतून मुख्यमंत्र्यांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. विशेष म्हणजे, या पिशव्या महिला कारागिरांकडून तयार केल्या जातात. त्यामुळे प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर आणि महिलांच्या कौशल्याला रोजगाराची संधी, असे दुहेरी उद्दिष्ट साधले जात आहे. पीआयटीसीएमआरएलने यापूर्वीही ‘आर्ट फ्रॉम स्क्रॅप’ उपक्रमांतर्गत माण डेपोतील ऑपरेशन्स कंट्रोल सेंटरमध्ये ‘कॉन्फ्लुएन्स’ ही १७ फूट उंच कलाकृती उभारली आहे. सुमारे १.६ टन वजनाच्या या कलाकृतीसाठी प्रकल्पाच्या बांधकामातून उरलेल्या १.५ टन जीआय स्टील, माइल्ड स्टील आणि मिश्रधातूंच्या भंगाराचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान, माण-हिंजवडी ते शिवाजीनगर जिल्हा न्यायालयापर्यंतची २३ किलोमीटर लांबीची आणि २३ स्थानकांची उन्नत मेट्रो मार्गिका तीन सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३ नोव्हेंबरला या मार्गिकेचे उद्घाटन झाल्यानंतर ४ नोव्हेंबरपासून प्रवासी सेवा सुरू झाली. पहिल्याच दिवशी या मार्गिकेवर सुमारे ५० हजार प्रवासी प्रवासांची नोंद झाली. पायाभूत सुविधा उभारताना निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा पुनर्वापर करून पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा कंपनीचा प्रयत्न या निमित्ताने समोर आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *