![]()
कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या सुधारित तंत्रज्ञानानुसार आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनानुसार जर शेतकऱ्यांनी तूर पिकाचे लागवडीपासून ते काढणीपर्यंत व्यवस्थापन केले तर तुरीचे भरघोस उत्पादन मिळेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायाळ यांनी केले. खेत बचाओ अभियान आणि विद्यापीठ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर उपक्रमांतर्गत शास्त्रज्ञांनी करमाळा तालुक्यातील कुंभारगाव आणि पोटेगाव येथील पाणी फाउंडेशनच्या शेतकरी गटांच्या प्रक्षेत्राला भेट दिली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. चांगदेव वायाळ बोलत होते. याप्रसंगी डॉ. नंदकुमार कुटे उपस्थित होते. डॉ. वायाळ म्हणाले, या भागातील शेतकऱ्यांना पारंपारिक पद्धतीने शेती करून एकरी तुरीचे पाच ते सहा क्विंटल उत्पादन मिळायचे. आता पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप डिजिटल शेती शाळा, कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान वापरून आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केवळ दोन किलो बियाण्यांचा वापर करून सुमारे एकरी १४ क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन मिळेल. पाणी फाउंडेशनच्या डिजिटल शेती शाळेद्वारे शेतकऱ्यांना विद्यापीठातील शास्त्रज्ञ ऑनलाइन पद्धतीने अविरत मार्गदर्शन करत असतात. शेती शाळेद्वारे विद्यापीठाने दिलेल्या तंत्रज्ञानाचा शेतकरी काटेकोर अवलंब करत असल्याने त्यांचे तुरीचे उत्पादन दुपटीने वाढले असल्याचे डॉ. वायाळ यांनी सांगितले. माजी कडधान्य पैदासकार डॉ. नंदकुमार कुटे म्हणाले, कडधान्य पिके म्हणजे शेतीच्या बांधावरची पिके अशी ओळख होती. परंतु विद्यापीठाचे सुधारित तंत्रज्ञान वापरून व शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तुरीच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे व्यवस्थापन केल्यापासून या गावातील शेतकऱ्यांच्या तुरीच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे. यावेळी कुटुंब महिला शेतकरी गटाच्या निमंत्रक सुप्रिया धुमाळ व अन्नपूर्ण महिला शेतकरी गटाच्या निमंत्रक सारिका कावळे व जयश्री कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कुटुंब महिला शेतकरी गट, कुंभारगाव व अन्नपुर्णा महिला शेतकरी गटाचे सर्व सदस्य आणि दोन्ही गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन व आभार महेंद्र देशमुख यांनी मानले. कृषी तंत्रज्ञानाचा होतोय फायदा कडधान्य पिके म्हणजे शेतीच्या बांधावरची पिके अशी ओळख होती. परंतु विद्यापीठाचे सुधारित तंत्रज्ञान वापरून व शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तुरीच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे व्यवस्थापन केल्यापासून तुरीच्या उत्पादनात भरघोस वाढ झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Source link
पारंपरिक शेतीला मिळतेय आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची जोड:विद्यापीठाच्या तंत्रज्ञानासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन; कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा