Headlines

अजितदादांच्या अपघातावेळी एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आमचं म्हणणं ऐकून घेतलं:सोनिया गांधींच्या पुस्तकाला शुभेच्छा देताना रोहित पवार भावुक




काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘Belonging: A Journey of Love’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सोनिया गांधी यांच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यातील संघर्षाला उजाळा देणारी एक अत्यंत भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावेळी सोनिया गांधींनी दाखवलेल्या संवेदनशीलतेची आठवणही सांगितली आहे. ‘दोन आघात सहन करूनही भारताशी नातं घट्ट केलं’ रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “सोनियाजींच्या ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचा जीवनप्रवास वाचकांसमोर आला असताना, माझ्या मनात राजकारणापलीकडच्या एका संवेदनशील, संघर्षशील व कणखर व्यक्तिमत्त्वाचे विचार येत आहेत. अवघ्या २१ व्या वर्षी आपलं घर, माणसं आणि परिचित जग मागं सोडून त्यांनी भारतात पाऊल ठेवलं आणि आपलं घर मानलं. मात्र, याच प्रवासात १९८४ मध्ये इंदिराजींचं तर १९९१ मध्ये राजीवजींचं दुःखद निधन अशा दोन आघातांना त्यांना सामोरं जावं लागलं. वैयक्तिक आयुष्यात इतकं मोठं दुःख सहन केल्यानंतरही त्यांनी परत जाण्याचा मार्ग न निवडता या देशाशी असलेलं नातं अधिक घट्ट करत सार्वजनिक जीवनात स्वतःला झोकून दिलं. संकटांनी खचून न जाता उभं राहण्याची त्यांची ही जिद्द खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे.” अजितदादांच्या अपघातावेळची ती आठवण सोनिया गांधींच्या संवेदनशील स्वभावाचा एक वैयक्तिक अनुभव सांगताना रोहित पवार भावुक झाले. ते म्हणाले, “त्यांच्या या संवेदनशील स्वभावाचा अनुभव मी स्वतः घेतला. अजितदादांच्या विमान अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी, या मागणीसाठी संसदेत त्यांची भेट घेतली असता त्यांनी केवळ आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, तर एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आमच्या दुःखाची जाणीव ठेवत या मागणीला ठाम पाठिंबा दिला. स्वतःच्या आयुष्यात अशाच दुःखद प्रसंगांना सामोरं गेलेल्या व्यक्तीलाच दुसऱ्याच्या वेदनेची तीव्रता इतक्या संवेदनशीलतेने समजू शकते, याची प्रचिती त्या भेटीत आली.” ‘माणुसकी जपणाऱ्या संस्कृतीचे प्रतिबिंब’ सोनिया गांधींच्या संघर्षाचे कौतुक करताना रोहित पवार पुढे म्हणाले, “आदरणीय सोनियाजींचा जीवनप्रवास हा केवळ एका व्यक्तीचा संघर्ष नाही, तर तो भारताच्या उदारमतवादी, सर्वसमावेशक व माणुसकी जपणाऱ्या संस्कृतीचंही प्रतिबिंब आहे. माणसाची ओळख त्याने जपलेल्या नात्यांतून, संकटांशी दिलेल्या लढ्यातून आणि इतरांच्या दुःखात दाखवलेल्या माणुसकीतून निर्माण होते. सोनियाजींच्या जीवनप्रवासातून हाच मानवी मूल्यांचा संदेश अधोरेखित होतो.” शेवटी, ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकाला मनापासून शुभेच्छा देत, “हे पुस्तक श्रीमती सोनिया गांधी यांच्यावर, गांधी-नेहरू कुटुंबावर आणि काँग्रेसवर निष्ठा व प्रेम असलेल्या देशभरातील कोट्यवधी कार्यकर्त्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल!” असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. ————– हेही वाचा.. दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज:सुप्रिया सुळेंची अजित पवारांच्या आठवणीत भावनिक पोस्ट
खासदार सुप्रिया सुळे यांनी भाऊबीजेच्या निमित्ताने दिवंगत अजित पवार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देणारी भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ‘दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या पोस्टसोबत त्यांनी अजित पवार यांच्यासोबतचे काही जुने फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत. पोस्टच्या शेवटी त्यांनी ‘मिस यू दादा’ असे लिहित अजित पवार यांची आठवण व्यक्त केली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *