![]()
जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व साखर सम्राट एकत्र येऊन एकमेकांच्या हातात हात घालू शकतात, मग शेतकऱ्यांच्या उसाला भाव देण्यासाठी त्यांना एकत्र येता येत नाही का? असा खोचक सवाल करत शेतकरी संघटनेने मंगळवारी अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासे फाटा येथील राजमुद्रा चौकात सुमारे दोन तास रस्ता रोको आंदोलन करत चक्का जाम केला. यावेळी आंदोलकांनी महामार्गावरच ठिय्या मांडून भजन करत साखर सम्राटांचा जाहीर निषेध करत आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेल्या प्रवरानगर साखर कारखान्यानेच आता उसाचा पहिला भाव जाहीर करावा, अशी मागणी केली. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनीच पहिला उसाला साडेचार हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली. सत्तेत असूनही आमदार मोर्चेकऱ्यांसोबत या आंदोलनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले ते आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांची उपस्थिती सत्तेत सहभागी असूनही शेतकऱ्यांच्या मागणीसाठी ते या आंदोलनात सामील झाले आणि मोर्चेकऱ्यांसोबत थेट उन्हात रस्त्यावर मांडी घालून बसलेले होते. यावेळी बोलतांना आमदार लंघे पाटील म्हणाले की, मी एक तालुक्याचा आमदार म्हणून नव्हे, तर शेतकरी पुत्र म्हणून तुमच्याबरोबर आहे. ऊस पिकवणे हे शेतकऱ्यांच्या हातात असले तरी भाव घेणे हे बळीराजाच्या हातात नाही. शेतकरी हा भीषण दुष्काळाला सामोरे जात असतांना ऊस पिकाला योग्य भाव मिळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची रक्कम वर्षानुवर्षे साखर कारखानदारांकडे पडून आहे, ती रक्कम व्याजासह देणे गरजेचे आहे. हीच माझी प्रमुख मागणी आहे. साखर सम्राटांवर चौफेर टीका यावेळी विविध मान्यवरांनी साखर सम्राटांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. जिल्हा बँक ही त्यांची कामधेनू म्हणून बिनविरोध केली, कारण या कारखानदारांकडे शेकडो कोटी रुपयांचे कर्ज आहे. पण घाम गाळून ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या उसाला भाव जाहीर केला नाही,” असा संताप आंदोलकांनी व्यक्त केला. ऊस तोडणी झाल्यानंतर 15 दिवसांत शेतकऱ्यांचे पैसे वर्ग करणे कायद्याने बंधनकारक असतांनाही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत नसल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांतून करण्यात आला. कारखानदारांच्या वजन काट्याची वैध तपासणी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. बुधवारच्या बैठकीकडे लक्ष बुधवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत बळीराजाच्या उसाला योग्य भाव जाहीर न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा भाजपाचे नेते अंकुश काळे यांनी दिला आहे. पंचगंगा पॅटर्न का नाही? पंचगंगा या खासगी साखर कारखान्याने बाहेरून वजन काटा करून ऊस आपल्या कारखान्यात आणण्याची मोकळीक शेतकऱ्यांना दिलेली असताना सहकारी साखर कारखाने नेमकी ही मुभा शेतकऱ्यांना का देत नाहीत? असा सवाल उपस्थित करून किरण जाधव यांनी साखर सम्राटांचा चांगलाच समाचार घेतला.
Source link
नेवासे फाट्यावर शेतकऱ्यांचा महामार्ग रोखला:भजन करत साखर सम्राटांचा निषेध; आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील रस्त्यावर मांडी घालून आंदोलनात सामील