![]()
दुचाकी अपघातात जावयाचा मृत्यू झाल्याचा बनाव लोणीकंद पोलिसांनी उघड केला. या प्रकरणी पोलिसांनी आजे सासरे आणि सासऱ्याला अटक केली आहे. आजे सासरे रहीम मोहम्मद शेख (वय 65) आणि सासरे अमर रहीम शेख (वय 45, दोघेही चौफुला वस्ती, कोलवडी, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सुलतान सादीक शेख (वय 24, शिवनेरीनगर, कोंढवा) असे मृत जावयाचे नाव आहे. त्याचा भाऊ साबीर सादीक शेख (वय 2) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, सुलतान शेख रिक्षाचालक होता. त्याचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पत्नीशी वाद झाल्यानंतर 9 नोव्हेंबरला सासू आणि सासरे पत्नीला घेऊन माहेरी गेले होते. पत्नीचा शोध घेत सुलतान रात्री चौफुला वस्तीतील सासरी गेला. तेथे आजे सासरे रहीम शेख आणि सासरे अमर यांनी सुलतानला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर दोघांनी त्याला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी सुलतानचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तो दुचाकीवरून पडून जखमी झाल्याचे त्यांनी डॉक्टरांना सांगितले. लोणीकंद पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक सुनिता रोकडे यांनी सांगितले की, आरोपींनी सुलतानचा मृत्यू अपघातात झाल्याचे सांगितले होते. मात्र, त्याला मारहाण झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली, तेव्हा घरासमोर अपघात झाल्याचे किंवा दुचाकी पडल्याचे दिसले नाही. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपींनी मारहाण केल्याची कबुली दिली. जावयाला मारहाण करण्यासाठी वापरलेले लाकडी दांडके पोलिसांनी जप्त केले आहे. पोलिस निरीक्षक एन. पवार पुढील तपास करत आहेत.
Source link
दुचाकी अपघाताचा बनाव उघड:जावयाची मारहाण करून हत्या करणाऱ्या सासऱ्यासह आजेसासऱ्याला अटक, पुण्यातील लोणीकंद पोलिसांची कारवाई