![]()
सोलापूर विमानतळावर गुरुवारी दुपारी शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. उड्डाणासाठी धावपट्टीवर वेग घेत असताना विमानावरील नियंत्रण सुटल्याने ते धावपट्टीच्या बाजूला असलेल्या कच्च्या जागेत घसरले. या दुर्घटनेत विमानाचे पुढील चाक निखळले असून विमान एका बाजूला कलंडले. मात्र, विमानात असलेल्या महिला प्रशिक्षणार्थी वैमानिकाचा जीव सुदैवाने वाचला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून वैमानिक सुखरूप असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. सोलापूरमधील होडगी रस्ता परिसरात असलेल्या विमानतळावर गुरुवारी (दि. १२) दुपारी अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार, एका खासगी फ्लाइंग क्लबचे प्रशिक्षणार्थी विमान उड्डाणासाठी सज्ज झाले होते. नियोजित उड्डाणासाठी विमानाने धावपट्टीवर वेग घेण्यास सुरुवात केली. मात्र, काही अंतर पुढे गेल्यानंतर अचानक विमानावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे विमान धावपट्टीवरून बाजूला घसरत कच्च्या जागेत गेले. या प्रक्रियेत विमानाच्या पुढील भागाला जोराचा धक्का बसला आणि पुढील चाक निखळले. त्यानंतर विमान एका बाजूला कलंडलेल्या अवस्थेत थांबले. घटनेच्या वेळी विमानात महिला प्रशिक्षणार्थी वैमानिक होती. विमान धावपट्टीवरून घसरल्यानंतर विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली. विमानाने अद्याप हवेत झेप घेतली नसल्याने आणि अपघात धावपट्टीवरच झाल्याने मोठी दुर्घटना टळली. विमानातील वैमानिकाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच ती सुखरूप असल्याची माहिती समोर आली. अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पोलिसांची घटनास्थळी धाव अपघाताची माहिती मिळताच विमानतळ प्रशासनाने तातडीने बचाव आणि सुरक्षेची यंत्रणा सक्रिय केली. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विमानातून इंधनगळती किंवा आग लागण्याचा धोका लक्षात घेऊन अग्निशमन दलाने खबरदारी घेतली. जवानांनी विमानाभोवती सुरक्षा व्यवस्था निर्माण केली. त्यानंतर महिला वैमानिकाला सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढण्यात आले. या घटनेत विमानाचे नुकसान झाले असले, तरी वैमानिकाला गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त नाही. अपघाताची माहिती शहरात पसरताच विमानतळाबाहेर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यामुळे काही काळ परिसरात उत्सुकतेचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट दरम्यान, शिकाऊ विमान धावपट्टीवरून नेमके कोणत्या कारणामुळे घसरले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. विमानातील तांत्रिक बिघाड, धावपट्टीवरील परिस्थिती किंवा विमान हाताळताना झालेली चूक यापैकी नेमके कारण काय होते, हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) नियमांनुसार या घटनेची तांत्रिक तपासणी होण्याची शक्यता आहे. या तपासणीत विमानाची यांत्रिक स्थिती, धावपट्टीवरील हालचाल आणि अपघातापूर्वीची परिस्थिती तपासली जाणार आहे. महिला वैमानिक सुखरूप बचावल्याने मोठी दुर्घटना टळली असली, तरी विमानतळावरील प्रशिक्षण विमानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. चौकशीतून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची प्रतीक्षा आहे. हेही वाचा…. मुंबईनंतर पुणे महापालिकेलाही बॉम्बने उडवण्याची धमकी:धमकीचा ई-मेल मिळताच यंत्रणा अलर्ट, बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारे ई-मेल प्राप्त झाल्याने दोन्ही शहरांतील सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे. मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा दावा या ई-मेलमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये बँका, न्यायालये, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, महालक्ष्मी रेसकोर्स, सीएसएमटी बस स्थानक, मुंबईच्या महापौरांचे कार्यालय तसेच प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचा समावेश आहे. मुंबईतील धमकीनंतर पुणे महापालिकेलाही बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल मिळाल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. सविस्तर वाचा….
Source link
सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमानाचा अपघात:धावपट्टीवरून घसरून पुढील चाक निखळले, महिला वैमानिक बचावली