- Marathi News
- National
- The School Turned Mothers Into Teachers; Now Children Are Learning Math In The Kitchen!
बबिता माली | पूर्व मेदिनीपूर22 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

माता मुलांना विविध भाषांतून वस्तूंची नावे, दैनंदिन शब्द शिकवू लागल्या आहेत.
वर्गात प्रत्येक मुलाची शिकण्याची क्षमता सारखी नसते. काही मुले पटकन शिकतात, तर काहींना थोडा अधिक वेळ लागतो. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमधील एका सरकारी शाळेने मुलांच्या घरालाच शाळा आणि त्यांच्या मातांना शिक्षक बनवण्याचा अनोखा प्रयोग सुरू केला आहे, जेणेकरून एकही मूल शिक्षणात मागे राहू नये.
पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील पटाशपूर येथील इटाचना प्राथमिक विद्यालयातील शिक्षक मातांना प्रशिक्षण देत आहेत. जेणेकरून दैनंदिन कामे करताना माता आपल्या मुलांना नवनवीन गोष्टी शिकवू शकतील. येथे चौथीपर्यंत शिक्षण दिले जाते. येथे ८५ विद्यार्थी आणि ४ शिक्षक आहेत. शाळेचे मुख्याध्यापक सुमन कल्याण प्रधान सांगतात, “याच वर्षी आम्ही विद्यार्थ्यांच्या मातांसाठी कार्यशाळा घेतली. त्यांना इंग्रजीतून संभाषण, सामान्य ज्ञान व अशा काही सोप्या युक्त्या शिकवल्या. तसेच वर्कशीट कशा समजावायच्या हेही शिकवत आहोत. यात मुलांना हात धरून शिकवावे लागते.
विविध टप्प्यांत दिले जाते प्रशिक्षण
सुमन म्हणाल्या, शाळा परिसरातच टप्प्याटप्प्याने मातांचे प्रशिक्षण सुरू आहे. पहिल्या टप्प्यात प्री-प्रायमरी ते पहिलीच्या २५ मातांना प्रशिक्षण देण्यात आले. सर्व मातांनी किमान दहावीपर्यंत शिक्षण घेतले असून त्यांना इंग्रजीचे प्राथमिक ज्ञान आहे. त्यांना इंग्रजी इंग्रजी, बंगाली आणि दैनंदिन वापरातील वस्तूंची नावे मुलांना कशी शिकवायची, याचे प्रशिक्षण देण्यात आले. आता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या मातांसाठी पुढील प्रशिक्षण कार्यक्रम होईल.
बालकांचे प्रगतीपुस्तक मातांकडे देतात
एका विद्यार्थिनीची आई मामोनी बेरा म्हणाल्या, “आमचा मातांचा स्वतंत्र गट आहे. शिक्षक मुलांच्या अभ्यासाची संपूर्ण माहिती देतात. आम्ही शाळेत गेलो की शिक्षक स्वतः विचारतात की मुलांबद्दल काही जाणून घ्यायचे आहे का.त्यामुळे मुलांचा कलही लक्षात येतो.
इंग्रजी वाक्ये आणि बेरीज-वजाबाकी शिकत आहेत
मी माझ्या मुलीला पाच बटाटे आणायला सांगते तेव्हा ती मोजून आणते. त्यामुळे तिला ‘पाच’ म्हणजे नेमके काय हे समजते. त्याच वेळी मी तिला बटाट्याला इंग्रजीत ‘पोटॅटो’ म्हणतात हेही सांगते. अशा प्रकारे मुले नवीन शब्द, वस्तूंची नावे, रोजच्या वापरातील इंग्रजी वाक्ये आणि बेरीज-वजाबाकी शिकत आहेत.”
– मामोनी बेरा, पहिलीची विद्यार्थिनी दीपशिखाची आई.