![]()
महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर मोर्शी आणि मुलताई (मासोद) पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवैध गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला. यात सुमारे ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट झाला. राज्य उत्पादन शुल्क विभागाला या अड्ड्याबद्दल माहिती नव्हती, त्यामुळे त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सीमेवरील घनदाट जंगलात अनेक दिवसांपासून मोहाची दारू काढली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. अमरावतीचे पोलिस अधीक्षक निकेतम कदम, अप्पर पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शीचे पोलिस निरीक्षक राहुल आठवले व मुलताईच्या मासोद चौकीतील पोलिसांनी सकाळी धाड टाकली. अड्ड्यावर ६ हजार लीटर क्षमतेच्या ३० ड्रममधील मोहा सडवा व दारू गाळण्याचे साहित्य जागेवरच नष्ट केले. या कारवाईमुळे अवैध दारू काढणारे व विक्रेते घाबरले आहेत. ठाणेदार राहुल आठवले यांच्यासह उपनिरीक्षक तुषार चव्हाण, नितीन इंगोले, योगेश सांभारे, मंगेश श्रीराव, छत्रपती करपते, स्वप्निल बायस्कर, अथर्व कोहळे व आरसीपी प्लाटूनच्या पथकाने ही कारवाई केली.
Source link
मोर्शी-मुलताई पोलिसांनी गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला:महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर संयुक्त कारवाईत 65 हजारांचा मुद्देमाल नष्ट